Jackie Chan Copied Shahrukh Khan : बॉलिवूडचे चित्रपट नक्कलच असतात. कधी ते साऊथ इंडियन चित्रपटाची नक्कल असतात तर कधी हॉलिवूड, कोरियन वा जगातील अन्य भाषांमधील चित्रपटांची नक्कल असतात. कधी कधी तर दोन चित्रपट एकत्र करून हिंदी चित्रपटांची निर्मिती केली जाते. बॉलिवूड हॉलिवूड किंवा साउथ इंडियन चित्रपटांची कशी नक्कल करते याबाबत आजवर अनेक वेळा लिहून आलंय. आजचा आपला विषय तो नाही. विषय आहे शाहरुख खान आणि जॅकी चेनमधील समानतेचा.


जॅकी चेन आशिया खंडातील सगळ्यात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, स्टंट कोऑर्डिनेटर आहे. याच जॅकी चेनचे भारतीय प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडचे अनेक कलाकारही प्रचंड फॅन आहेत. यात शाहरुख खानचाही समावेश होतो. शाहरुख खान जॅकी चेन आणि त्याचा चित्रपटांचा फार मोठा फॅन आहे. त्यामुळेच जॅकी चॅनच्या अनेक चित्रपटांमधील दृश्ये त्याने जशीच्या तशी त्याच्या चित्रपटात उचललेली आहेत. यात लगेचच आठवणारे नाव म्हणजे बादशाह. अब्बास मस्तान दिग्दर्शित हा चित्रपट हॉलिवूडच्या दोन चित्रपटांवर आधारित आहे. त्यापैकी जॅकी चॅनचा द नाईस गाय, रश अवर हे काही.. या दोन्ही सिनेमातील अनेक दृश्यांची शाहरुखने 'बादशाह'मध्ये कॉपी केलीय. भारतीय प्रेक्षकांनी बादशाह सिनेमाला डोक्यावर घेतलं होते. शाहरुखने अनेकदा जॅकी चेनचा फॅन असल्याचे सांगितलं आहे.





 


 


दोन वर्षांपूर्वी शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी यूएईला गेला होता. त्यावेळी तेथे हॉलिवूडचा अॅक्शन स्टार जॉन क्लॅड व्हॅन डॅम आणि जॅकी चॅन आले होते. शाहरुखने या दोघांसोबत सेल्फी घेतला आणि तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्याच्यासोबत त्याने माझ्या आवडत्या हीरोला भेटल्याचा आनंद होतोय असे म्हटलेलं. बॉलिवूडमधील सगळ्यांनी शाहरुखच्या या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स देऊन पसंती व्यक्त केली होती. 


शाहरुखचा आवडता हीरो असलेल्या जॅकी चॅनच्या आयुष्यात सात वर्षांपूर्वी म्हणजे 2014 मध्ये शाहरुखच्या जीवनात आता जसा प्रसंग आला आहे तसाच कठीण प्रसंग आला होता. त्याच्या मुलाला जेसी चॅनला बीजिंग पोलिसांनी ड्रग्ज घेत असताना अटक केली होती. त्याच्यासोबत तैवानी अभिनेता कोई कोसुद्धा होता. जेसीकडे ड्रग्ज सापडले होते. न्यायालयात खटला दाखल झाला. जेसीला पकडल्यानंतर जॅकी चॅनने लगेचच, जेसीने चूक केली. त्याने असे करायला नको होते. मी त्याच्याबद्दल माफी मागतो असे जाहीरपणे सांगितले होते. एवढेच नव्हे तर कुठल्याही कलाकाराने जॅकीची भेट घेऊन त्य़ाच्य़ा मुलाच्या कृत्याचे समर्थन केले नव्हते. आणि मुलगा अजून लहान आहे असे वक्तव्यही केले नव्हते.


जॅकीचा मुलगा दोषी सिद्ध झाला आणि त्याला दोन हजार यूआनच्या दंडासह सहा महिन्यांची शिक्षा झाली. सहा महिन्यानंतर जेसी तुरुंगातून बाहेर आला. त्यानेही पत्रकारांशी बोलताना, चूक झाल्याचे मान्य केले. समाजात नाव असलेल्या आमच्यासारख्या लोकांनी सार्वजनिक जीवनात वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. आमच्यासारखे वागण्याचा प्रयत्न नागरिक करतात. मी चूक केली. यापुढे मी असे कधीही करणार नाही असेही जेसीने म्हटले होते.


आज या सगळ्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे शाहरुखच्या मुलाला आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. सात दिवस त्याने कोठडीत घालवलेत. त्याला आज जामीन मिळेल असे म्हटले जात होते. पण आजही त्याला जामीन मिळाला नाही. मात्र सात दिवस झाले तरी शाहरुखने या प्रकरणी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. किंवा मुलाच्या कृत्याबद्दल माफीही मागितलेली नाही. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शाहरुखला समर्थन दिलेय. रितिक रोशन आणि सुनिल शेट्टी यांनी तर आर्यन लहान आहे असं पाठराखण करणारं वक्तव्य केलंय.


खरं तर जॅकी चॅनला आपला हीरो मानणाऱ्या शाहरुख खानने जॅकी चॅनच्या चित्रपटांची कॉपी करण्यासोबतच त्याच्याकडून आणखी थोडं शिकण्याचीही गरज आहे. शाहरुख आता तरी मुलाच्या कृत्याबद्दल माफी मागणार का हाच प्रश्न त्याच्या फॅन्सच्या मनात उद्भवत आहे.