मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचं कोरोनामुळे निधन झालं. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. एबीपी न्यूजशी बातचीत करताना मारुतीराव काळे यांच्या मुली कल्पना काळे आणि मीना काळे यांनी सांगितलं की, "बाबांना 7 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यामुळे आम्ही त्यांना मुंबईतील वांद्रेमधल्या होली फॅमिली रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु वृद्धापकाळामुळे त्यांना कोरोनावर मात करता आली नाही आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 26 आणि 27 मे दरम्यान रात्री रुग्णालयात त्यांचं निधन झालं."
मारुतीराव काळे यांनी 'दीवार', 'रोटी कपड़ा और मकान', 'कभी कभी' 'दो अंजाने', 'रजिया सुल्तान', 'पाकिजा, 'शोर', 'पूरब और पश्चिम', 'मेरा साया', 'यादगार', 'जांबांज' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. स्वतंत्र कला दिग्दर्शक म्हणून 'ईमान धरम' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी 'डिस्को डांसर', 'कसम पैदा करनेवाले की', 'डांस डांस', 'कमांडो', 'अजूबा', 'सौदागर' यांसारख्या मोठ्या आणि हिट चित्रपटांसाठी मुख्य कला दिग्दर्शक म्हणून सेट्स डिझाईन केले होते.
मारुतीराव काळे यांनी बॉलिवूडच्या 100 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. विशेष म्हणजे कला दिग्दर्शक बनवण्यापूर्वी मारुतीराव काळे सुतारकाम करत होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केलं होतं. 1960 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'मुगल-ए-आजम'साठीही त्यांनी सुतार म्हणून काम केलं होतं.
मारुतीराव काळे यांनी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'सौदागर'साठी सेट्स डिझाईन केले होते. सुभाष घई यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "मारुतीराव काळे अतिशय प्रतिभावंत आणि दिग्गज कला दिग्दर्शक होते. त्यांचं जाणं अतिशय दु:खद आहे."
1983 मध्ये प्रतिष्ठित 'लंडन फिल्म्स प्रॉडक्शन्स लिमिटेड' कंपनीने सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून मारुतीराव काळे यांची मदत घेतली होती.