मुंबई : सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची फेसबुकवर जाहीर माफी मागितली आहे. दोन वर्षांपूर्वी दोघात झालेल्या गैरसमजाबद्दल अरिजीतने पडती बाजू घेतली आहे. ही पोस्ट अरिजीतने नंतर फेसबुकवरुन डिलीट केली आहे.


 

 
'मी सलमान खानचा अपमान केला नव्हता. ही गोष्टी मी त्याला हरतऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा मेसेज करुनही काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे फेसबुकवरुन सार्वजनिकरित्या माफी मागणं हा एकमेव पर्याय दिसत आहे' असं अरिजीतने आपल्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

 

'नीता यांच्या घरी मी केवळ तुमची माफी मागण्यासाठी आलो होतो. मात्र तुम्ही ऐकलं नाहीत. काही हरकत नाही. मी इथे सर्वांसमक्ष तुमची माफी मागतो. मात्र मी तुमच्यासाठी सुलतान चित्रपटात गायलेलं गाणं कृपया हटवू नका, अशी नम्र विनंती करतो. तुम्हाला हे गाणं दुसऱ्या गायकाकडून गाऊन घ्यायचं असेल, तर काहीही हरकत नाही, पण हे व्हर्जन राहू द्या.' असं अरिजीत प्रांजळपणे लिहितो.

 

 



 

 

'मी खूप गाणी गायली आहेत, मात्र निवृत्त झाल्यावर माझ्या संग्रहात तुमच्यासाठी गायलेलं एक तरी गाणं असावं, अशी माझी इच्छा आहे. प्लीज माझ्या या भावना माझ्याकडून हिसकावू नका. गैरसमजातून का असेना, माझ्यामुळे सलमानला अपमानास्पद वाटलं असेल, तर मी त्यासाठी जाहीर माफी मागतो' असं अरिजीतने लिहिलं आहे.

 

 

 



 

आपल्या कुठल्याही सिनेमात अरिजीतने पार्श्वगायन करु नये, अशी अट सलमानने घातल्याचं वृत्त होतं. गिल्ड्स पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि अरिजीतमध्ये मजामस्तीतून गैरसमज वाढल्याचं म्हटलं जातं. या सोहळ्यात सलमानच्या हस्ते अरिजीतने पुरस्कार स्वीकारला होता.