Anya : 'अन्य' (Anya) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा मराठीसह हिंदीतदेखील प्रदर्शित होणार आहे. आगामी बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या यादीतील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अन्य' सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
उत्सुकता वाढवणाऱ्या 'अन्य'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरदेखील सध्या या सिनेमाचीच चर्चा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी केलं आहे. प्रत्येक माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा असतोच... तसाच प्रत्येक चांगल्या माणसातसुद्धा वाईट माणूस असतो... आणि प्रत्येक वाईट माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा चांगला माणूससुद्धा असतो... असा विचार मांडणारा 'अन्य' हा सिनेमा आहे.
हेरगिरी, सत्य परिस्थिती, सेक्स ट्रॅफिकींग, बालमजूरी, अनाथांची व्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आजघडीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा 'अन्य' देशात बदल घडवणारे विचार सादर करणारा असल्याचं ट्रेलरमध्ये पहायला मिळालं आहे. सत्य घटनांवर आधारलेला हा सिनेमा मानव तस्करीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेऊन समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा प्रयत्न 'अन्य' या सिनेमात करण्यात आला आहे.
'अन्य' या सिनेमाने लंडनमधील फॅलकॉन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर' आणि 'बेस्ट पिक्चर' असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. 'ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' आणि 'टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळवली आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा
अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. यांच्या जोडीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही नावलौकीक मिळवलेली अभिनेत्री रायमा सेन, हिंदी सिनेसृष्टीतील यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव हे कलाकारही 'अन्य'मध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
संबंधित बातम्या