मुंबई : 'बाहुबली' चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये दाक्षिणात्या सौंदर्यवती अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांच्या जोडीला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देवसेना-बाहुबली पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र झळकावेत, अशी दोघांच्याही चाहत्यांची इच्छा होती. 'साहो' चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणारी ही इच्छा अर्धवट राहिली आहे.


साहो चित्रपटात प्रभाससोबत अनुष्का शेट्टीला साईन करण्यात येणार होतं. मात्र अनुष्काच्या वाढत्या वजनामुळे तिचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. अनुष्काच्या जागी 'हसीना पारकर' श्रद्धा कपूर हिची निवड जवळपास निश्चित झाली आहे.

साहो चित्रपटासाठी आधीपासूनच श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत होतं, मात्र मानधनावरुन बोलणी अडली होती. सोनम कपूर, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया अशा अनेक अभिनेत्रींसोबत या रोलसाठी चर्चा झाली होती. अखेर श्रद्धाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

हसीना पारकर चित्रपटात श्रद्धा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा ती साकारणार आहे. पहिल्यांदाच ती आईच्या भूमिकेत असून अंकुर भाटिया तिचा पती इब्राहिम पारकर, तर सिद्धार्थ कपूर दाऊदच्या भूमिकेत झळकणार आहे.