नवी दिल्लीः निर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींना माफी मागण्यासाठी केलेल्या ट्वीटवरुन कोलांटउडी घेतली आहे. आपण पंतप्रधानांकडून माफीची मागणी केली नव्हती, तर आपलं मत व्यक्त केलं होतं, असं अनुराग कश्यपने फेसबुकवर पोस्ट लिहून जाहीरपणे सांगितलं आहे.


करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल मुश्किल’चं समर्थन करत बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला होता. पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशवासीयांची माफी मागावी,  असं ट्वीट अनुरागने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन केलं होतं.

अनुराग कश्यप म्हणतो...

''हे दुर्देवी आहे की, मला माझ्या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागतंय. कारण माझ्या या मताने मला आणि माझ्या इंडस्ट्रीतल्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

बॉलिवूडलाच सतत सॉफ्ट टार्गेट केलं जातं, कंटाळा आलाय या सर्वांचा. एखाद्या मुद्द्यावर मौन बाळगलं तरी बॉलिवूड गप्प म्हणून टार्गेट केलं जातं आणि मत व्यक्त केलं तरी त्याचा विपर्यास केला जातो. किंवा सनसनाटी बातम्यांसाठी आमच्या वक्तव्याचा वापर केला जातो. तरीही मी माझं वैयक्तिक मत व्यक्त केलं. पण याचा असा अर्थ घेतला की अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींना पाकिस्तान भेटीबद्दल माफी मागण्याची विनंती केली आहे. 'ऐ दिल है मुश्किल'ची शूटिंग चालू असतानाच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी भविष्यातील परिस्थितीवर चर्चाही झाली असेल. मात्र तरीही एकालाच याची किंमत मोजावी लागत आहे. सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातलेली नाही, किंवा त्यांना पाकिस्तानात हाकलून दिलेलं नाही, आणि माझ्या (उडता पंजाब)  सिनेमावर पंतप्रधानांनी बंदी आणली नाही, हे सर्व मला माहिती आहे. पण आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला मीडिया, गुंड आणि राजकीय पक्षांपासून संरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. अशा संकटाच्या काळातही सरकारचे प्रतिनिधी काही प्रतिसाद देत नाहीत, कारण ते पंतप्रधानांच्या मताचं निरीक्षण करत असतात. म्हणूणच मी थेट पंतप्रधानांन सवाल केला. आमच्या देशभक्तीबद्दल शंका घेणाऱ्यांसाठी मी 'भारत माता की जय'च्या घोषणेचंही ट्विट केलं आहे. तरीही हे सगळं घडलं. हे सगळं टीका करणाऱ्यांसाठी हास्यस्पद होतं. कारण देशभक्तीपर घोषणा तुम्हाला या सर्वातून मुक्त करु शकत नाही. अपेक्षा करतो की एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे...''