Ananya Movie Released On Prime : जगण्याची नवी दिशा देणारा 'अनन्या' (Ananya) सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' असं म्हणत 22 जुलैला 'अनन्या' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात प्रेक्षकांना 'अनन्या'चा जिद्दीचा प्रवास पाहायला मिळाला. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मुख्य भूमिकेत आहे. 


'अनन्या' सिनेमाचे कथानक काय? 


'अनन्या' या सिनेमात प्रेक्षकांना स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' पाहायला मिळणार आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र 'अनन्या' पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना सिनेमात दिसते. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा मोलाचा सल्ला देणारा हा सिनेमा आहे. 


अनन्याचा जिद्दीचा प्रवास उलगडणार!


'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कडने केलं आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात धाडसी वृत्तीची अनन्या दिसणार आहे. अनन्याचा जिद्दीचा प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनन्या सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते,"आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा सिनेमा आहे". 'अनन्या' हा सिनेमा येत्या 25 ऑगस्टपासून प्रेक्षक अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. 


एकांकिका, नाटक ते सिनेमा.. असा आहे 'अनन्या'चा प्रवास


'अनन्या' सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली होती. या सिनेमाच्या माध्यमातून हृताने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. रुईया महाविद्यालयाची 'अनन्या' एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर या एकांकिकेचे नाटकात रुपांतर करण्यात आले. नाटकात ऋतुजा बागवेने अनन्याचे पात्र साकारले होते. 'अनन्या' सिनेमात हृता दुर्गुळेने अनन्या देशमुख हे पात्र साकारलं आहे. 


संबंधित बातम्या


Ananya : 'शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे'; हृता दुर्गुळेने शेअर केले 'अनन्या'चे पोस्टर


Unad Movie : आदित्य सरपोतदारचा 'उनाड' सिनेमागृहात होणार प्रदर्शित; 'झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त सिनेमाची निवड