मुंबई :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या नाती नव्या आणि आराध्यासाठी एक खास पत्र लिहिलं आहे. पत्र लिहिण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करुन मला हे पत्र लिहायचं होते म्हणून मी लिहिलंय या आशयाचा मेसेज केला आहे.

 



या पत्रातून त्यांनी नव्या आणि आराध्याला स्त्री असल्यामुळे लोक आपले विचार लादण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करा असा प्रेमळ सल्लाही दिला आहे.

 



"आराध्याचे पणजोबा हरिवंशराय बच्चन आणि नव्याचे पणजोबा एचपी नंदा यांच्याकडून तुम्हाला एक वारसा म्हणून प्रतिष्ठा आणि सन्मान मिळाला आहे ."असंही अमिताभ आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

 



"तुम्ही बच्चन किंवा नंदा असण्याआधी एक स्त्री आहात. त्यामुळे लोक तुमच्यावर आपली मतं लादण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही काय करावं, कुठे जावं, कुणाला भेटावं, कसं वागावं, याबद्दलची आपली मतंही लादतील. पण तुम्ही तुम्हाला जे आवडेल तेच करा." अमिताभ यांनी नातींना लिहिलेल्या पत्रात सांगितलं.

 

https://twitter.com/SrBachchan/status/772717203963555840

 

"तुमच्या स्कर्टची लांबी तुमचं चारित्र्य ठरवू शकत नाही. तसंच तुम्ही कुणाशी मैत्री करावी किंवा कोण तुमचे मित्र असावेत याबद्दल कुणाला आपलं मत द्यायलाही देऊ नका," असंही अमिताभ म्हणाले आहेत.

 



 

"लग्न करतानाही कुणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. तुम्हाला वाटेल तेव्हाच लग्नाचा निर्णय घ्या. लोक काय म्हणतील याचा विचारही करु नका. लोक बोलतील पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा." नातींना अमिताभ यांनी सांगितलं आहे.

 

अमिताभ बच्चन यांचा पिंक हा सिनेमा 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात ते एका वकिलाची भूमिका बजावताना दिसतील.