Amitabh Bachchan Angry During Movie Shooting : बॉलिवूडचे शहेनशाह, बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन हे वयाच्या 81 व्या वर्षीदेखील चांगलेच सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन हे सेटवर वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. नवख्या दिग्दर्शकांनासोबतही ते सहजपणे काम करतात. सेटवर अमिताभ बच्चन काहीवेळेस आपल्या सूचना देत असल्याचे म्हटले जाते. अशाच एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांचे एका सीनच्या शूटवरून दिग्दर्शकासोबत जोरदार वाजले होते. मात्र, त्यानंतर रात्री अमिताभ यांनी पुन्हा दिग्दर्शकाला फोन केला.
अमिताभ बच्चन यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या सेकंड इनिंगमध्ये जोरदार कमबॅक केले.बिग बींनी आपल्या सेकंड इनिंगमध्येही संस्मरणीय भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन यांना सेटवर सहसा राग येत नाही. पण, ज्यावेळी राग येतो तेव्हा तो खूपच वाईट असतो असे त्यांना ओळखणारे सांगतात. 19 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, त्यांचा त्याच्याच दिग्दर्शकाशी वाद झाला.
कोणत्या चित्रपटाच्या वेळी झाला वाद?
वर्ष 2005 मध्ये पॉलिटिकल जॉनर असलेला 'सरकार' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी केले होते. 'सरकार'मधील एका सीनवरून रामगोपाल वर्मा आणि अमिताभ बच्चन यांच्यात वाद झाला. राम गोपाल वर्मा याने नुकतेच एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली.
सरकार बद्दल बोलताना दिग्दर्शक राम गोपाल वर्माने अमिताभ बच्चन सोबतच्या मतभेदाबद्दल माहिती दिली. अमिताभ यांच्यासोबतच्या इतक्या वर्षात त्यांनी एकदाच मतभेद व्यक्त केले असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले.
राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की, ''सरकार'मध्ये, जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला घर सोडून जाण्यास सांगतात. या सीनच्या आधी कुटुंबामध्ये विशेषत: सरकार आणि त्यांच्या मुलात जेवताना वाद झालेला असतो. त्यामुळे ते आधीच नाराज असतात. कोणताही वडील आपल्या मुलाला सगळी आशा-अपेक्षा संपल्यावर घराबाहेर काढतात. हा एक क्लिनिकल निर्णय आहे. अशा वेळी तुम्ही कोणतीही भावना ठेवत नाहीत आणि कठोर निर्णय घेता. मात्र, अमिताभ बच्चन माझ्या मताशी असहमत होते. काहीही झाले तरी एक बाप आपल्या मुलाला दूर करू शकत नाही, असे त्यांचे मत होते.
राम गोपाल वर्मा यांना मध्यरात्री बिग बींचा फोन
राम गोपाल वर्मा यांनी पुढे सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत या विषयावर अधिक बोलणं टाळलं आणि त्यांनी केलेल्या सूचनेनुसार, तो सीन शूट केला. तो सीन त्यांच्या मनासारखा झाला. मात्र, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अमिताभ यांनी फोन केला. त्यांचा फोन आल्याने मीच हैराण झालो होतो असे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले. अमिताभ यांनी राम गोपाल वर्मांना फोन करून सांगितले की, मी तू सांगितलेल्या गोष्टींचा विचार करत आहे. मला वाटतं की तू योग्य बोलत आहे. त्यामुळे तू सांगितल्याप्रमाणे आपण तो सीन पुन्हा शूट करुयात असे अमिताभ यांनी सांगितले. अमिताभ यांनी तो सीन पुन्हा शूट केल्यानंतर माझ्या कल्पनेपेक्षाही अधिक दमदार अभिनय त्यांनी केला असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले.
'सरकार' हा चित्रपट 13 कोटींमध्ये तयार झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2005 मध्ये या चित्रपटाने 40 कोटींहून अधिक कमाई केली. अभिषेक बच्चनला या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर आणि आईफा पुरस्कार मिळाला होता.