Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. बॉलिवूडबरोबच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी जर काम केलं तर चित्रपट निर्मात्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेय यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना दिला आहे.
अमेय खोपकर यांचं ट्वीट
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.' अमेय खोपकर यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांच्या या ट्वीटला अनेकांला अनेकांनी लाइक केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
2029 मध्ये ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने चित्रपट उद्योगात काम करणार्या पाकिस्तानी कलाकारांवर संपूर्ण बंदी जाहीर केली होती. मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे.
या पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये केलं काम
माहिरा खान,वीना मलिक, सबा कमर या पाकिस्तानी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. तसेच अली जफर पाकिस्तानी अभिनेत्यानं देखील बॉलिवूडमध्ये काम केले.
गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरला काही लोक विरोध करत आहेत. या चित्रपटातील रावणच्या लुकला तसेच चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX ला अनेकांनी ट्रोल केले. या चित्रपटाला अमेय खोपकर यांनी पाठिंबा दिला होता. अमेय खोपकर यांनी एक ट्वीट शेअर केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: