मुंबई : प्रभासच्या आगामी 'साहो' चित्रपटात श्रद्धा कपूर झळकणार आहे. वाढत्या वजनामुळे अभिनेत्री अनुष्का शेट्टीला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर श्रद्धा ही फर्स्ट चॉईस नव्हती. श्रद्धापूर्वी ही भूमिका आलिया भटला ऑफर झाल्याची माहिती आहे.


आलियाने मात्र साहो चित्रपटातील भूमिका नाकारल्याचं समोर आलं आहे. आलियाला सहाय्यक व्यक्तिरेखा साकारण्यात रस नसल्यामुळे तिने ही ऑफर रिजेक्ट केल्याचं 'बॉलिवूड लाईफ' वेबसाईटवर म्हटलं आहे. आलियानंतर श्रद्धा कपूरला या रोलबाबत विचारणा करण्यात आली होती, आणि तिने तात्काळ होकार दिला.

श्रद्धा कपूर साकारत असलेल्या भूमिकेची लांबी प्रभासच्या व्यक्तिरेखेच्या तुलनेत कमी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बाहुबलीस्टार सोबत काम करण्याची संधी दवडायची नसल्यामुळे श्रद्धाने ही ऑफर स्वीकारल्याची चर्चा आहे.

हायवे, उडता पंजाब सारख्या चित्रपटांमध्ये आलिया भटने केलेल्या भूमिका प्रेक्षकांनी गौरवल्या असल्या, तरी 'कॉफी विथ करन'मध्ये तिने तोडलेले अकलेचे तारेच अनेकांना लक्षात राहतात. सुपरस्टार प्रभाससोबत 'साहो' चित्रपट नाकारुन आलियाने असाच मूर्खपणा केल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.

वाढत्या वजनामुळे प्रभासच्या 'साहो'तून अनुष्काचा पत्ता कट

आलियाने सध्या मुख्य भूमिका करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं जातं. नुकतंच तिने मेघना गुलजारच्या 'राजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्याशिवाय शाहरुखची भूमिका असलेल्या आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात ती कॅमिओ करणार आहे.

भट कुटुंबीयांनीही आलियाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. श्रद्धा कपूरपूर्वी कतरिना कैफ आणि 'मोहंजोदारो'फेम पूजा हेगडेला या रोलबाबत विचारणा झाल्याचं बोललं जात होतं.

अॅक्शन-थ्रिलर साहो चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय झळकणार आहेत. अभिनेत्री मंदिरा बेदीही खलनायिकेच्या भूमिकेत दिसण्याची चर्चा आहे. हैदराबाद, मुंबई आणि अबूधाबीमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे.

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?


तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रन राजा रन (2014) फेम दिग्दर्शक सुजित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. मे 2018 मध्ये साहो रीलिज होण्याची शक्यता आहे.

सुमारे 150 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. या सिनेमासाठी प्रभासने त्याचं वजनही कमी केलं आहे.