Alia Bhatt : यशराज फिल्मसकडून निर्मिती होणाऱ्या स्पाय युनिव्हर्स (YRF Spy Universe) चित्रपटांची सीरिजमध्ये आता आलिया भटचीही एन्ट्री झाली आहे. आलिया भट (Alia Bhatt) पहिल्यांदाच यशराजच्या स्पाय युनिव्हर्स फिल्मस सीरिजमध्ये झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मागील काही महिन्यांपासून आलिया भटदेखील यशराजच्या स्पाय मुव्ही सीरिजमध्ये झळकणार असल्याची चर्चा होती. आता मात्र, प्रोडक्शन हाऊसनेच या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.
यशराज फिल्मसचे सीईओ अक्षय विधानी यांनी फिक्की फ्रेमस दरम्यान मंगळवारी आलिया भट आणि स्पाय मुव्ही सीरिजबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, सिनेइंडस्ट्रीमधील एक गौप्यस्फोट करणार आहे. आलिया भट स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण याच वर्षी सुरू होणार आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती येत्या काही दिवसात सगळ्यांसमोर येईल, असेही विधानी यांनी सांगितले.
या अभिनेत्रीचीही लागली वर्णी
या अॅक्शनपटात आलिया भटसोबत शर्वरी वाघ ही अभिनेत्रीदेखील झळकणार आहे. शर्वरी वाघने 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी', 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. अॅमेझॉन प्राईमवर झळकलेल्या द फॉरगॉटन आर्मी - आझादी के लिए या वेब सीरिजमध्ये सनी कौशलसोबत झळकली होती. त्यानंतर बंटी और बबली 2 चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
YRF च्या स्पाय युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटांची यादी
YRF च्या स्पाय युनिव्हर्सची सुरुवात सलमान खानच्या 'एक था टायगर' मधून झाली. त्यानंतर 'टायगर जिंदा है' आणि हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या 'पठाण'ची या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' प्रदर्शित झाला. आता या फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट 'वॉर 2' आहे. अयान मुखर् याचे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये हृतिक रोशन, जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.