बॉलिवूड लाईफ या वेबसाईटच्या वृत्तानुसार सुलतानच्या सिक्वेलचा सध्या कुठलाही विचार नसल्याचं अली अब्बास जफरने स्पष्ट केलं आहे. एका आघाडीच्या दैनिकाने आदित्य चोप्राने सुलतानच्या सिक्वेलची घोषणा केल्याची बातमी छापली होती.
इतकंच नाही, तर दिग्दर्शक अलीला पटकथेवर कामाला सुरुवात करण्यासही सांगितल्याचं म्हटलं होतं. धूम सीरिजप्रमाणे सुलतानची सीरिज काढण्याचा चोप्रा यांचा विचार असल्याचंही या बातमीत म्हटलं होतं. मात्र जफर यांनी या अफवा उडवून लावल्या आहेत.
'ही एक स्पोर्ट्सवर आधारित फिल्म आहे. कोणत्याही चित्रपटासाठी एक फिलॉसॉफी असणं महत्त्वाचं आहे. कुस्ती हा फक्त एक खेळ नसून स्वतःशी असलेला एक लढा आहे, ही या सिनेमाची फिलॉसॉफी होती. सुलतान ही व्यक्तिरेखा याच्याशी सुसंगत होती. त्यामुळे यासारखी तगडी व्यक्तिरेखा मिळाल्याशिवाय सिक्वेलचा विचार करणार नाही' असं जफर यांनी सांगितलं आहे.
'सुलतान'ची घोडदौड कायम, दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सुलतान सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. ‘सुलतान’ने कमाईची घोडदौड दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ‘सुलतान’ने 37.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बुधवारी, ‘सुलतान’ 36.54 कोटींसह यंदाच्या वर्षात पहिल्या दिवसात सर्वात मोठी कमाई सिनेमा ठरला होता.
या सिनेमाची दोन दिवसातील कमाई 73.74 कोटी रुपये झाली आहे. सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे.