मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार 'बेबी', 'एअरलिफ्ट', 'हॉलिडे' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे लोकप्रिय झाला आहे. मात्र त्याचा आगामी चित्रपट 'टॉयलेट एक प्रेमकथा' अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जीभ कापून आणणाऱ्या व्यक्तीला एक कोटी रुपयांचं पारितोषिक देण्याची घोषणा काही संत-महंतांनी केली आहे.


'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटात नंदगाव आणि बरसाना गावातील तरुण-तरुणीचं लग्न दाखवण्यात येणार आहे. यावर मथुरेतील काही संतांनी आक्षेप दर्शवला आहे. महापंचायतीच्या एका बैठकीत चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जीभ हासडून आणणाऱ्याला एक कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली. नारायण सिंह यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथा'चं दिग्दर्शन केलं आहे.

नंदगाव आणि बरसाना या दोन गावातील मुला-मुलींचं एकमेकांशी लग्न न लावण्याची प्रथा आहे. मात्र या चित्रपटात तशाप्रकारचं लग्न लावताना दाखवण्यात येणार आहे. या सीनमुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा बरसाना गावातील महापंचायतीत संतांनी केला. वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा पायदळी तुडवण्याचा डाव असल्याचं संतांनी म्हटलं आहे.

महापंचायतीला दोनशेहून जास्त व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये सहा गावांचे प्रधान, संत आणि स्थानिकांचा सहभाग होता. महापंचायतीच्या तीन दिवस आधीच 20 प्रधानांनी लग्नाच्या या सीनविरोधात याचिका दाखल केली होती.

अक्षयकुमारच्या 'टॉयलेट..' चित्रपटातून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत काळजी न घेणाऱ्या व्यक्तींवर बोचरी टीका करण्यात येत आहे.