'सुपर हीरो है ये पगला', अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'चं नवं पोस्टर
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2017 01:14 PM (IST)
'पॅडमॅन'चं दिग्दर्शन आर बाल्की करणार असून निर्मितीची जबाबदारी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असेलला 'पॅडमॅन' सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे. "सुपरहीरो है ये पगला, आ रहा है 26 जनवरी 2018 को," या कॅप्शनसह अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये अक्षय कापसाच्या ढिगावर उभा असलेला दिसत आहे. हा ढीग सॅनिटरी नॅपकिन बनण्याचा सेटअप वाटत आहे. https://twitter.com/akshaykumar/status/935020780202614784 ‘पॅडमॅन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले. अक्षय आणि सोनम एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघांनी 2011मध्ये ‘थँक्यू’ या सिनेमात काम केलं होतं. तर राधिका आपटे पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत कारण करणार आहे. 'पॅडमॅन'चं दिग्दर्शन आर बाल्की करणार असून निर्मितीची जबाबदारी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय 'पॅडमॅन'मध्ये अक्षयसोबत सोनम आणि राधिकाची मुख्य भूमिका अक्षयचे पॅडमॅन आणि 2.0 प्रजासत्ताक दिनालाच रिलीज होणार?