मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, सलमान खान, सनी देओल आणि अजय देवगन यांना सिनेरसिकांना वेगेवगळ्या सिनेमांमध्ये पाहिलं आहे. मात्र, हे चौघेही कधीच एकाच सिनेमात दिसले नाहीत. या चौघांनाही एकाच सिनेमात पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
90 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या या चारही अभिनेत्यांनी बॉलिवूडवरील आपला दबदबा आजपर्यंत कायम ठेवला आहे. प्रत्येकाच्या अभिनयाची वेगळी स्टाईल आणि वेगळा असा चाहता वर्ग आहे.
आत हे चारही सुपरस्टार सिनेरसिकांना एकाच सिनेमात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचं असंय की, 2010 साली प्रदर्शित झालेला हॉलिवूड सिनेमा ‘एक्स्पेंडेबल्स’च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, सनी देओल आणि अजय देवगन असतील, अशी माहिती मिळते आहे.
जर सर्व प्लॅनिंगनुसार पार पडलं, तर आगामी काळात बॉलिवूडमधील चार सुपरस्टार एकाच सिनेमात पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळेल.
‘एक्स्पेंडेबल्स’चे निर्माते एव्ही आणि यारिव लेर्नर यांनी बॉलिवूड निर्माते निलेश सहास यांच्याशी हिंदी रिमेकबाबत चर्चा केल्याचेही म्हटले जात आहे.
हॉलिवूडमधील सिनेमांमध्ये ज्याप्रकारे अॅक्शन दिसते, त्याचप्रकारे ‘एक्स्पेंडेबल्स’मध्येही पाहायला मिळेल, असे बोलले जात आहे.
अक्षय कुमार, सलमान खान, सनी देओल आणि अजय देवगन एकाच सिनेमात काम करण्यासाठी होकार देतात का आणि होकार दिल्यास सिनेमाची शूटिंग सुरु होऊन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.