अक्षय कुमार सर्वात कठीण मेहनत करणारा अभिनेता : सलमान खान
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 06:36 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'रोबो 2' म्हणजे 2.0 चा फर्स्ट लूक लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता सलमान खानने अक्षय कुमारच्या कामाच्या शैलीचं तोंडभरुन कौतुक केलं. ''आम्हा कलाकारांपैकी कुणी पुढे गेलं असेल तर तो फक्त अक्षय कुमार आहे. त्याच्यामधील काम करण्याची क्षमता दाद देण्यासारखी आहे. सर्वात कठीण मेहनत करणाऱ्या अभिनेत्यांपैकी अक्षय एक आहे'', असं सलमान म्हणाला. 'रोबो 2' चा फर्स्ट लूक काल मुंबईत यशराज स्टुडिओमध्ये लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेमाचे दिग्दर्शक एस. शंकर, रजनीकांत, अक्षय कुमार आणि करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. सलमान कार्यक्रमासाठी येईल, अशी कोणाला कल्पनाही नव्हती. मात्र आपण अचानक का आलो, याचा खुलासाही सलमानने केला. रजनीकांत यांना पाहण्यासाठी आपण इथे आलो, असं सलमान म्हणाला.