Akshay Kumar Helps Jackky Bhagnani : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे (Akshay Kumar) बिग बजेट चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाल्याने निर्माते वासू भगनानी (Vashu Bhagnani ) यांचे प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेन्मेंटचे मोठे आर्थिक नुकसान झाले. प्रोडक्शन हाऊसबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या. भगनानी यांची निर्मिती असलेला बिग बजेट 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊसला आणखी एक मोठा धक्का बसला. आर्थिक नुकसान झाल्याने क्रू आणि कलाकारांनादेखील पैसे देता आले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये अक्षय कुमारने निर्मात्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी सांगितले की, वासू भगनानी यांनी 'मिशन रानीगंज', 'गणपत' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाशी संबंधित क्रूचे 65 लाख रुपये थकित आहेत. त्यानंतर अक्षय कुमार त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. वासू भगनानी यांचा मुलगा आणि पूजा एंटरमेंट कंपनीचे जॅकी भगनानीने याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अक्षय कुमार याने आपले मानधन हे सगळ्यांची थकबाकी दिल्यानंतर देण्यास सांगितले आहे. आधी क्रूचे थकीत पैसे देण्याची सूचनाही अक्षय कुमारने केली आहे.
पूजा एंटरटेनमेंट तोट्यात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर निर्माते वाशू भगनानी यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ज्यांना प्रोडक्शन हाऊसकडून पैसे मिळाले नाहीत, त्यांनी समोर येण्याचे आवाहन केले होते. पूजा एंटरटेन्मेटकडून कोणाचेही नुकसान होणार नसल्याचेही वासू भगनानी यांनी सांगितले. आता, भगनानी यांच्या या कठीण काळात अक्षय कुमार पुढे सरसावला आहे.
अक्षय कुमारने काय म्हटले?
वासू भगनानी यांचा मुलगा निर्माता जॅकी भगनानी याने सांगितले की, पूजा एंटरटेन्मेंटला झालेल्या नुकसानाबाबत चर्चा करण्यासाठी अक्षय कुमार यांनी मला बोलावले. त्यांनी सगळी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी म्हटले की, जोपर्यंत क्रू आणि इतर कलाकारांना त्यांची थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत माझ्या मानधनाची रक्कम देऊ नये असे अक्षय कुमारने म्हटले.
क्रू व्यतिरिक्त, 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, टायगर श्रॉफ, अलाया एफ आणि मानुषी छिल्लर या कलाकारांनादेखील त्यांचे मानधन मिळाले नसल्याची चर्चा आहे. एका वृत्तानुसार, टायगर श्रॉफने या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतले नाही.