Akshay Kumar First Pay Cheque : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज त्याची गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. आज खिलाडी कुमार एका सिनेमासाठी कोट्यवधींचं मानधन घेत असला तरी त्याची पहिली कमाई किती होती याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
खिलाडी कुमारने नुकतच एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या कमाईबद्दल भाष्य केलं आहे. अक्षयचा 'सौगंध' हा सिनेमा आधी प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी 'दीदार' या सिनेमाने त्याला पहिला ब्रेक दिला. 'दीदार' या सिनेमासाठी अक्षयने 50 हजार रुपये मानधन घेतलं होतं. तर 'सौगंध' या सिनेमासाठी अक्षयला 75 हजार रुपये मिळाले होते.
10 वर्षांत कमावले 18 ते 20 लाख रुपये
अक्षय कुमार म्हणाला, "10 कोटी कमवण्याची माझी इच्छा होती. पण करिअरच्या सुरुवातीच्या 10 वर्षात मी फक्त 10 ते 20 लाख कमवू शकलो. 10 कोटी कमवायला मला 12 वर्षे लागली आहेत. त्यानंतर मी खूप मेहनत घेतली. पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमात विविध भूमिका साकारल्या आणि 10 कोटींऐवजी 100 कोटी कमावले. सतत काम करत राहणं गरजेचं आहे.
अक्षय कुमारचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले असले तरी त्याचे काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉप झाले आहेत. याबद्दल बोलताना खिलाडी कुमार म्हणाला, "माझे सलग 16 सिनेमे फ्लॉप झालेले आहेत. तर एकेकाळी 8 सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. मला वाटतं, प्रेक्षकांचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. प्रेक्षकांना हलक्या-फुलक्या गोष्टींपासून ते जगातील कानाकोपऱ्या घडणाऱ्या घटनांपर्यंत अनेक गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून पाहायच्या आहेत. त्यामुळे आता सिनेमा निवडताना खूप विचार करण्याची गरज आहे".
अक्षयचा 'सेल्फी' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप!
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करु शकलेला नाही. आतार्यंत या सिनेमाने फक्त 6.35 कोटींची कमाई केली आहे. अक्षयचे मागच्या वर्षी 'बच्चन बांडे', 'रक्षाबंधन','सम्राट पृथ्वीराज',' रामसेतू' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पण हे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. 'सेल्फी'नंतर खिलाडी आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या