मुंबई : सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात आपलं नाव घेतल्यानं अभिनेता अक्षय कुमारने राशिद सिद्दीकी नावाच्या यू ट्यूबर विरूद्ध 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
अक्षय कुमारच्या जवळच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि एबीपी न्यूजला सांगितले की, राशिद सिद्दीकी नावाचा युट्यूबर आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून बॉलिवूड विरोधात वाईट-साईट बोलत होता तर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातही त्याने अक्षय कुमारवर अनेक आरोप केले होते.
25 वर्षीय राशिद सिद्दीकी बिहार मधील रहिवासी असून तो सिव्हील इंजिनिअर असल्याचे सांगितले जात आहे. सुशांतसिंग राजपूतच्या बाबतीत त्याने वेगवेगळ्या व्हिडिओंद्वारे अक्षय कुमारवर अनेक खळबळजनक आरोप केले होते. अशाच एका व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की अक्षय कुमार सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण असलेली रिया चक्रवर्तीला कॅनडाला पळवून नेण्याच्या तयारीत होता. इतकेच नाही तर सुशांतसिंग राजपूतला 'एम. एस धोनीसारखा मोठा चित्रपट मिळाल्याबद्दलही अक्षयकुमार नाराज असल्याचा दावा राशिदने केला आहे. याशिवाय अक्षय कुमार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना गुप्तपणे भेटला असल्याचंही राशिदने म्हटला आहे.
सलमान खानच्या ड्रायव्हरसह स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण; भाईजान सेल्फ क्वॉरंटाईन
विशेष म्हणजे, शिवसेनेचे कायदेशीर कक्षाचे वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी अलीकडेच राशिद सिद्दीकीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्याआधारे वांद्रे पोलिसांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याबद्दल राशिद सिद्दीकीला अटक केली होती. नंतर राशिदला कोर्टाकडून जामीन मिळाला. त्याचवेळी गेल्या 4 महिन्यांत राशिदने बनावट व्हिडिओ बनवून आपला यू ट्यूब चॅनेल एफएफ न्यूजवर पोस्ट करून 15 लाखाहून अधिक कमाई केली. तर सप्टेंबर महिन्यात त्याने 6.5 लाख रुपये कमावले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
अभिनेता अक्षय कुमारचा युट्यूबरवर 500 कोटींचा दावा, सुशांत आत्महत्येप्रकरणी अक्षयचे फेक व्हिडीओ शेअर