मुंबई : अक्षय कुमार हा नट आपल्या फिटनेसबद्दल ओळखला जातो. काहीही झालं तरी तो आपल्या वेळापत्रकात बदल करत नाही. ठरलेल्या वेळेत उठणे.. ठरलेल्या वेळेत व्यायाम करणे.. खाणे या सगळ्या गोष्टी तो आवर्जून पाळतो. त्यातही व्यायाम आणि इतर गोष्टी इकडच्या तिकडे होऊ शकतात. पण खाणे आणि विशिष्ट तास झोप तो नेहमी घेतो. हा त्याचा नियम गेल्या 18 वर्षांपासूनचा आहे. पण याच आपल्या नियमाला अक्कीने आता छेद दिला आहे.
गेल्या 18 वर्षापासून अक्षय कुमारने एक वेळापत्रक ठरवून घेतलं. कामाच्या वेळेचं. ते असं की शिफ्ट कोणतीही असो अक्षय आपल्या कामाची शिफ्ट आठ तासांची करतो. तेवढं काम झालं की तो चित्रिकरण करत नाही. शिफ्ट वगळून उरलेल्या वेळेत व्यायाम आणि इतर कामं करणं हा त्याचा शिरस्ता आहे. पण स्कॉटलंडला गेल्यानंतर मात्र अक्षयने या वेळापत्रकाला छेद दिला आहे. नेहमी आठ तास काम करणाऱ्या अक्षयने आता मात्र या नियमाला फाटा दिला आहे. सध्या अक्षयकुमार 'बेलबॉटम' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी स्कॉटलंडला गेला आहे. तिथे काही दिवसांचं शूट आहे. लॉकडाऊनमुळे चित्रीकरणाला खो बसला होता. आता काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतासह इतर देशांमध्ये चित्रीकरणं सुरु झाली आहेत. कोरोनाची सगळी काळजी घेऊन ही सगळी टीम स्कॉटलंडला पोहोचली. तिथेही त्यांनी त्या देशाच्या नियमानुसार क्वॉरन्टाईन व्हावं लागलं. त्यामुळे चित्रीकरणाचे ते दिवस वाया गेले. आता त्यांचं चित्रीकरण सुरु झालं आहे.
बाहरेच्या चित्रिकरणाला निर्मात्याचा बराच पैसा लागलेला असतो. आधीच चित्रीकरण लांबल्यामुळे निर्मात्याचे बरेच पैसे वाया गेले आहेत. खर्च वाढला आहे. तो कमी करण्यासाठी अक्षयने आपल्या या आठ तासांच्या आठरा वर्षापासूनच्या नियमाला बगल दिली आहे. या चित्रपटासाठी अक्षयने 16 तास काम करायचं ठरवलं आहे. निर्मात्याला ही गोष्ट कळल्यावर तो खूपच भारावून गेला आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत जॅकी भग्नानी. ते म्हणाले, "अक्षय हा खरोखरच निर्मात्याचा विचार करतो. त्याला येणाऱ्या खर्चाची पुरेपूर कल्पना आहे. आमचं सगळं युनिट डबल शिफ्टमध्ये काम करत आहे. कारण, सिनेमा चांगला बनवायचा आहेच, पण खर्चही आवाक्यात आणण्याचा प्रत्येकजण आपल्यापरीने प्रयत्न करतोय. अक्षय इतकी वर्ष आठ तास काम करतो हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे तो असा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं. तरीही त्याच्या या निर्णयाने संपूर्ण युनिटमध्ये जोश आला आहे. हे टीमवर्कच सिनेमा अधिक चांगला बनवेल."
अक्षय कुमार या लॉकडाऊनच्या काळात मुंबईतच होता. इथे राहूनही त्याने अनेक कोविड योद्ध्यांना मदत केली आहे. मुंबई पोलिसांपासून नाशिक पोलिसांपर्यंत अनेक युनिट्सना त्याने आपल्या परीने मदत केली आहे. अक्षय कुमारचं काही दिवसांपूर्वी फोर्ब्सच्या यादीतही नाव आलं होतं. गेल्या वर्षात सर्वाधिक मानधन कमावलेला तो देशातला क्रमांक एकचा अभिनेता बनला आहे. तर जगातल्या सर्वाधिक मिळकत असलेल्या कलाकारांमध्ये अक्षय पहिल्या दहा क्रमांकात आहे.