Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट टक्कर आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाशी झाली आहे. अक्षय कुमारचे या वर्षी प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. न चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कित्ती कलेक्शन जमवले, याचा अंदाज लावण्यात आला आहे.
अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. यावरून असे दिसतेय की, हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘रक्षाबंधन’ने पहिल्या दिवशी केवळ 7.5-8 कोटींचा व्यवसाय केला आहे, जो अक्षयच्या उर्वरित चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या तुलनेत खूपच कमी आहे.
कलेक्शन वाढण्याची अपेक्षा!
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गुजरातमध्येच चांगला व्यवसाय केला आहे. मात्र, असे असले तरी देशाच्या इतर भागात अर्थात मुंबई, कोलकाता, पुणे अशा ठिकाणी ‘रक्षाबंधन’ची जादू फारशी चालली नाही. वीकेंडपर्यंत चित्रपट चांगला व्यवसाय करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन चाहत्यांची भेट घेतोय. अक्षयसोबत त्याची टीम देखील प्रवास करत आहे. अक्षयसोबतच अभिनेत्री भूमि पेडणेकर, सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, दीपिका खन्ना आणि सहजमीन कौर हे कलाकार ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केलं आहे. अक्षयच्या या चित्रपटात भरपूर फॅमिली ड्रामा आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे.
ओटीटीवर होणार प्रदर्शित
'रक्षा बंधन' हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर काही दिवसांनी 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. 'रक्षा बंधन' चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगला गल्ला जमवावा, यासाठी अक्षय अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. 'रक्षा बंधन' या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. याआधी दोघे 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात एकत्र दिसले होते.
संबंधित बातम्या