अक्षय, सायनाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2017 10:11 AM (IST)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अक्षय आणि सायनाला नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. यानंतर अक्षय कुमार आणि सायना नेहवालने शहीद जवानांचा कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्या मदतीलाच आक्षेप घेत नक्षवाद्यांनी चक्क एक पत्रक काढून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापुढे नक्षली हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु नका, असा इशाराही नक्षलवाद्यांनी दिला आहे. नक्षलवाद्यांच्या पत्रकात लिहिलं आहे की, "हे देशभक्त नाहीत. उलट देशातल्या गरीबांचे मारेकरी आहेत. बस्तरमध्ये केलेली पोलिसांची तैनाती ही तिथल्या गरीबांवर अत्याचार करण्यासाठी आहे. खुनी कुत्र्यांना शहीद समजून अक्षय कुमार आणि सायना नेहवालने केलेल्या आर्थिक मदतीचा आम्ही निषेध करतो. देशातील दिग्गजांनी या सैनिकांऐवदी क्रांतिकारी आंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे, असं आवाहन आम्ही करत आहोत." अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा आम्ही निषेध करतो, असं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी म्हणजेच पीएलजीएने पत्रकात म्हटलं आहे.