Akash Bhadsavle Limca Book of World Record : मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राला नाटकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. नाटक गंभीर असो, विनोदी असो, सस्पेन्स असो किंवा संगीत नाटक; दर्दी रसिक मराठी नाटकांना आवर्जून उपस्थित राहतात. नाट्य क्षेत्रामध्ये यापूर्वी काही विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. अशातच आता आकाश भडसावळे (Akash Bhadsavle) नाट्य क्षेत्रातला नवा विक्रमवीर ठरला आहे. त्याने केलेल्या रेकॉर्डची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये (Limca Book Of World Record) करण्यात आली आहे.


आकाश भडसावळेने काय रेकॉर्ड केला?


अभिनेता आकाश भडसावळे यानेही एकाच दिवसात सलग 12 प्रयोगांचा नवीन विश्वविक्रम 9 ऑक्टोबर 2022 या दिवशी पूर्ण केला. या रेकॉर्डची नोंद 2024 च्या 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे. 'करनाटकू' संस्थेची निर्मिती आणि प्रसिद्ध व्यावसायिक निर्मिती संस्था 'अभिजात' च्या पाठिंब्याने ठाणे आणि मुलुंड येथे हे यशस्वी प्रयोग सादर झाले. यावेळी एकूण 3 नाटकांचे प्रत्येकी 4 असे 12 प्रयोग सादर झाले. 


योगेश सोमण (Yogesh Soman) लिखित सस्पेन्स 'टेलिपथी', सुयश पुरोहित लिखित व दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी 'मरणोत्पात' आणि इरफान मुजावर लिखित 'अस्थिकलश' या एक अंकीय नाटकांचे प्रत्येकी 1 तास असे 12 प्रयोग सादर केले गेले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला गतवर्षी आकाशने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 3 क्रांतिकारी नाटकांचा महोत्सवही केला होता. ज्याला अतुल परचुरे, कुमार सोहोनी, योगेश सोमण यांची हजेरी होती. 






आकाश भडसावळेच्या नाटकांबद्दल जाणून घ्या.. (Akash Bhadsavle Drama)


अभिनेता आकाश भडसावळे त्याच्या चरित्र भूमिकांसाठी ओळखला जातो. 'होय मी सावरकर बोलतोय' नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर, कै. विश्राम बेडेकर लिखित प्रसिद्ध नाटक 'टिळक आणि आगरकर' नाटकातील सुधारक गोपाळ गणेश आगरकर अशा त्याच्या काही गाजलेल्या भूमिका आहेत.  'वासूची सासू' हे त्याचे विनोदी नाटक रंगभूमीवर तुफान गाजतंय. यात (पद्मश्री) नयना आपटे, अंकुर वाढवे, अमोघ चंदन अशी दिग्गज कलाकार मंडळी काम करीत आहेत. पूर्वी दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेली नाटकातील अण्णांची भूमिका स्वतः आकाश भडसावळे करीत आहे. तसेच सध्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय ' या नाटकात आकाश 'महात्मा गांधींजींची' भूमिका करतोय. 


रंगकर्मींची मान अभिमानाने उंचावणारा विश्वविक्रम


आकाशने केलेला हा नवा विश्वविक्रम अनेक तरुण रंगकर्मी आणि अभिनेत्यांना नक्कीच आश्वासक आहे. या विक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या सोबत असलेल्या कलाकारांनाही हा अनुभव अतिशय रोमांचकारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


एक अंकीय नाट्य प्रकारात विक्रम करणारा आकाश भडसावळे हा महाराष्ट्रातील एकमेव अभिनेता आहे. मराठी माणसांची आणि नाट्य क्षेत्रातील प्रतिभावंत रंगाकर्मींची मान अभिमानाने उंचावणारा हा विश्वविक्रम आहे.