मुंबई : अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अजय देवगणने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कोणत्याही पाकिस्तानी कलाकारसोबत स्क्रीन शेअर करणार नाही, असं अजय म्हणाला. त्याचसोबत पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीचंही समर्थन केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगण म्हणाला की, "सीमेच्या पलिकडून गोळीबार होत आहे, अशा परिस्थितीत कोणत्याही पाकिस्तानी कलाकारसोबत काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

"ही वेळ देशाच्या पाठिशी राहण्याची आहे. याबाबतीत माझं स्पष्ट मत आहे की, तुम्ही सर्वात आधी भारतीय आहात. माझे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होत नसतील तरी मला फरक पडत नाही. त्यांचे कलाकार त्यांच्या देशासोबत आहेत. ते इथे कमावतात, पण देशाची साथ देतात. आपल्याला त्यांच्याकडून शिकायला हवं," असं अजय म्हणाला.

आपल्याकडून चर्चेची अपेक्षा केली जाते. पण एक देश हल्ला करत असताना दुसरा देश चर्चा करेल, हे शक्य आहे का?, असा सवाल करत अजय देवगणने पाकिस्तानवर निशाणा साधला.

अजयच्या या विधानानंतर काही वेळानेच त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलने ट्वीट करुन अजयचं कौतुक केलं.

दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस अजय देवगणचा 'शिवाय' चित्रपट रिलीज होणार आहे.