बॉक्स ऑफिसवर पुन्हा क्लॅश, 'अय्यारी'चं 'पॅडमॅन'ला ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2018 11:03 AM (IST)
पद्मावत सारख्या तगडी सिनेमाशी स्पर्धा करुन नुकसान होण्याच्या भीतीने पॅडमॅननेही दोन आठवडे पुढे उडी मारली.
मुंबई : अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट काही केल्या नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' सिनेमाची पाठ सोडताना दिसत नाही. बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी'ने तारीख बदलली, मात्र आता 'पॅडमॅन'नेही तारीख बदलून अय्यारीने निवडलेलीच रीलीजिंग डेट ठरवली आहे. यावर डोक्यावर हात मारुन घेत 'अय्यारी'ने 'पॅडमॅन'ला ट्वीट करुन अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'अय्यारी' हा चित्रपट यंदा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजे 26 जानेवारी 2018 रोजी रीलिज करण्यात येणार होता. मात्र अक्षयचा पॅडमॅन आणि रजनीकांतचा 2.0 (कोणे एके काळी ठरलेली रीलीजिंग डेट) यांनीही हाच दिवस निवडला. यथावकाश रजनीचा 2.0 ही एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्याचवेळी संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती'चं घोंगडं भिजत होतं. अखेर 'पद्मावती'चं पद्मावत झालं आणि 25 जानेवारीला हा सिनेमा रीलिज होण्याचं निश्चित झालं. या दोन चित्रपटांसोबत टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी'कार नीरज पांडेंनी सामंजस्याने आपलं बस्तान हलवलं.