मुंबई : हवाई दलातली पहिली वैमानिक म्हणून गौरवली गेलेली कारगिल गर्ल गुंजन सक्सेनावर हिंदी चित्रपट रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सने हा रिलीज केला असून या जान्हवी कपूरची मुख्य भूमिका आहे. चित्रपट रिलीज होऊन काही तास उलटायच्या आतच या चित्रपटावर भारतीय हवाई दलाने नाराजी नोंदवली आहे.


गुंजन सक्सेनाची यशस्वी झेप या चित्रपटात दिसते. गुंजन आपल्या कर्तृत्वाने हवाईदलात भरती होते खरी. पण ट्रेनिंग कॅम्पमध्ये गेल्यावर तिला तिथे बराच संघर्ष करावा लागला असं चित्रपटात आहे. ट्रेलरमध्येही ते दिसतं. यातून भारतीय हवाईदलाची नकारात्मक छबी निर्माण करण्यात आल्याचं हवाईदलाचं म्हणणं आहे. तसं पत्र त्यांनी सेन्सॉर बोर्डाला लिहिलं आहे. तर त्याची प्रत नेटफ्लिक्स आणि धर्मा प्रॉडक्शन्स यांनाही पाठवली आहे. या पत्रात हवाईदल म्हणतं, 'हा चित्रपट बनवण्यापूर्वी करण जोहर यांनी भारतीय हवाईदलाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भारतीय नौदलाने त्यांना ना हरकत दिली. पण आता या चित्रपटातून हवाई दलाबद्दल नकारात्मक बाबी समोर येतायत. ज्यात खरंतर तथ्य नाही.'


हवाई दलाच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा करण जोहर नव्या वादात सापडला आहे. हा चित्रपट गुंजन सक्सेनाने खरंच ज्या गोष्टी अनुभवल्या त्यावर बेतलेला आहे. त्यामुळे ते अनुभव खरे असल्याचं चित्रपटाच्या निकटवर्ती सूत्रांकडून समजतं. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, ट्रेलर पाहिल्यावरच ही बाब आमच्या लक्षात आली होती. चित्रपट या माध्यमाचा विचार करता गुंजनची व्यक्तिरेखा अतिरंजित करणं हे ठीक आहे. पण त्यात हवाई दलाबद्दल जे नकारात्मक चित्रण झाले आहे ते दुर्दैवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या चित्रपटात गुंजन सक्सेना जेव्हा ट्रेनिंग कॅम्पमध्ये जाते तेव्हा तिथे तिला स्वच्छतागृह नसते, कपडे बदलायला जागा नसते.. ती आहे म्हणून तिथले इतर प्रशिक्षणार्थी तिच्यासोबत प्रशिक्षण घेणं टाळतात. ती मुलगी आहे म्हणून तिला काही मोहिमा दिल्या जात नाहीत, अशा काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यावर हवाई दलाची नाराजी आहे.


संबंधित बातम्या :



Movie Review | 'गुंजन' जरा चुकलीच.. बाकी सब चंगा!