हा काळ होता साधारण 1995 चा. म्हणजे, त्याकाळी इंटरनेट नव्हतं. ते नसल्यामुळे जग एकमेकांजवळ आलं नव्हतं. माहितीचा प्रचंड प्रवाह अंगावर आदळत नव्हता. जगभरातल्या घडामोडींनी शहाणं होता येत नव्हतं. त्यामुळे आपल्याच जुन्या पुराण्या प्रथांना चिकटून बसण्याचा तो काळ होता. त्यात काही वावगंही नव्हतं. कारण वर्षानुवर्ष तेच तर चालत आलं होतं. काळापलिकडे विचार होत नव्हता. महिला हळूहळू आपआपल्या पायावर उभ्या राहू लागल्या होत्या. बॅंकेत, शाळेत, कॉलेजात महिला दिसू लागल्या होत्याच. पण पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिला अभावाने दिसायच्या. असा तो काळ. त्या काळात गुंजन सक्सेना नावाच्या एअरफोर्स पायलटने आपल्या उपस्थितीने सगळे नियम बदलले. सिनेमातही तो उल्लेख आहे. गुंजन आपलं ट्रेनिंग पूर्ण करून उधमपूर ट्रेनिंग कॅम्पमध्ये जायचं निश्चित होतं. ती यायच्या दिवशी तिथला इन्स्ट्रक्टर इतर पायलटसना सांगतो, अबसे इधर के कायदे कानून बदलनेवाले है. अब जॅकेट की झिप पूरी तरह से उपर होनी चाहिये. अब यहां अश्लील जोक्स नही चलेंगे.. इधर सब बदलनेवाला है.. हे चित्र बदलणार असतं कारण, या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पहिल्यांदाच एक मुलगी सहभागी होणार असते. तिचं नाव असतं गुंजन सक्सेना. त्या गुंजनची गोष्ट दिग्दर्शक शरन शर्माने आपल्यासमोर मांडली आहे.


गुंजनच्या कर्तृत्वातच तिचा परिस्थितीशी जोडलेला संघर्ष लपलेला आहे. पहिली महिला एअरफोर्स पायलट आणि कारगिलमध्ये जाऊन तिने कसं शौर्य बजावलं असा त्याचा दुहेरी विषय आहे. सिनेमातही कारगिलमध्ये गाजवलेल्या शौर्याची दखल घेण्यात आली आहे. पण तो सिनेमाचा विषय नाही. आजवर केवळ आणि केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रामध्ये जेव्हा महिला अवतरते तेव्हा तिला कशा पद्धतीने अॅडजस्ट करावं लागतं आणि इच्छा असेल तर कशा गोष्टी सावरता येतात त्याची ही गोष्ट आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे जसं खरं आहे, तसं पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी महिलेला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शिरकाव करायचा असेल तर त्यासाठीही पुरुषाचा सपोर्ट असणं आवश्यक आहेच. गुंजनला तो मिळाला. आधी वडिलांच्या रूपाने आणि नंतर उधमपूर ट्रेनिंग कॅम्पमध्ये तिच्या सिनिअर ट्रेनिंग ऑफिसरच्या रुपाने. छोट्या छोट्या प्रसगांमधून गुंजनचं अवघडलेपण दिग्दर्शकाने सुरेख मांजलं आहे. या ट्रेनिंग कॅम्पवर गुंजनला चेंजिंग रूम नसणं. या कॅम्पमध्ये केवळ पुरुषांसाठी स्वच्छतागृह असणं. अशा अनेक गोष्टी यात आहेत. शिवाय, मेल इगोही यात दाखवण्यात आला आहे. प्रसंगांमधून गुंजन आणि भवतालची परिस्थिती दिसत राहते.


सिनेमा गुंजनच्या लहानपणापासून सुरू होतो. म्हणजे, सुरुवातीला 'आज'मधून दिसताना चित्र दिसतं. पण सिनेमाचा मूळ विषय सुरू होतो गुंजन साताठ वर्षाची असल्यापासून. लहानपणापासून तिला असलेलं विमानाचं आकर्षण. त्यातून तिला वडिलांचा मिळालेला पाठिंबा. छोट्या छोट्या टप्प्यावर आलेलं अपयश.. त्यातून तिने घेतलेली भररी अशा टप्पांमधून गुंजनचा प्रवास सिनेमात दिसतो. नेटकी पटकथा.. आणि खळवून ठेवणारी दृश्य यामुळे चित्रपट रंजन करतो. त्याला मोठा हातभार पार्श्वसंगीताने लावला आहे. काही संवाद फार सुरेख आहेत. विशेषत: वडील आणि गुंजनमध्ये अनेक प्रसंग सुरेख झाले आहेत. दहावीला 94 टक्के मिळाल्यानंतर भर पार्टीत मला शिक्षण पुरेय असं म्हणणारा प्रसंग खसखस पिकवतो. पक्षाने पिंजरा तोडून उडणं कसं गरजेचं आहे हे सांगणारा प्रसंगही कमाल वठला आहे. या सगळ्या प्रसंगात पंकज त्रिपाठी आहे. पंकजने काबिले तारीफ काम केलं आहे. अत्यंत संयत तरीही अत्यंत महत्वाचे संवाद त्याने लीलया पेरले आहेत. या सर्व सिनेमात पंकज त्रिपाठी सुपर भाव खाऊन जातात. शिवाय, अंगद बेदी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. शिवाय विनित कुमार सिंग, मानव वीज यांच्या भूमिकाही तितक्याच तगड्या झाल्या आहेत.


सिनेमाचं पार्श्वसंगीत प्रभावी आहे. जीती रहो.. जीतती रहो.हे गाणं असेल किंवा रेखा ओ रेखा. अशी गाणी श्रवणीय झाली आहेत. मुळात दिग्दर्शकाला गोष्ट कशी आणि किती सांगायची याचं भान आहे. त्यामुळे त्याने फाफटपसारा टाळला आहे. वडिल-मुलीचं असोसिएशन यात दिसतंच. पण त्याही पलिकडे, भाऊ म्हणून असलेली काळजी बहीण-भावाच्या संवादातून कळते. त्यात दिग्दर्शक फार अडकलेला नाहीय. कारण गोष्ट गुंजनची सांगायची आहे. तर असा सगळा मामला आहे..


आता मुद्दा उरतो जान्हवी कपूरचा. तिने गुजन सक्सेना ही मुख्य भूमिका साकरली आहे. तिच्या वाट्याला तिच्या कुवतीपेक्षा फार मोठी भूमिका आली आहे. म्हणून सुरूवातीला फिट वाटणारी जान्हवी उधमपूरनंतरच्या प्रसंगांमध्ये तोकडी वाटायला लागते. सुरूवातील ती फिट वाटते कारण, इतर मुलींप्रमाणेच ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली.. लाड. प्यारसे पली बढी.. अशी मुलगी असल्यामुळे तिला फार काम करायला स्कोप नाहीय. ती जशी आहे, तशीत ती वावरली आहे. तोवर ठीक आहे. पण खरं जिथून तिचा एअरफोर्सचा प्रवास सुरू होतो, तिथून तिच्यात होणारा बदल.. दाखवण्यात ती सपशेल अपयशी ठरली आहे. म्हणजे, अनेक प्रसंग आणखी उठायला हवे होते असं वाटून जातं. अंगचणी छोटी असणं.. गोरी दिसणं. हा मुद्दा नाही.. पण पायलटच्या अंगी प्रशिक्षण घेतल्यानंतर जो डौल येतो.. तो डौल तिथे दिसत नाही. त्यामुळे ट्रेनिंग कॅम्पपासून जसा सिनेमा पुढे जातो, तशी तिच्या व्यक्तिमत्वात गुंजन न दिसता केवळ जान्हवी दिसू लागते. तरीही आपण सिनेमा सोसतो कारण, तिच्या भवताली असलेले जबरदस्त कलाकार. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनित सिंग, मानव वीज आणि इतर सगळी मंडळी. जान्हवीचे संवाद 'पेल' वाटू लागतात. त्यात अनुभवातून आलेला आत्मविश्वास दिसत नाहीत. त्यामुळे फार हळहळ वाटत राहते. अर्थात आपण ते सोसतो कारण, तिला सांभाळून घ्यायला 'पुरी कायनात' एकवटली आहे. यात संगीत, पार्श्वसंगीत, छायांकन, संकलन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतर कलाकार यांचा महत्वाचा सहभाग आहे. म्हणून सिनेमा सोसवतो.


याशिवाय दिग्दर्शकाने ही बाब लक्षात घेऊन जान्हवीला सोलो संवाद कुठेही ठेवलेले नाहीत. सतत तिच्यासोबत एक खमका अभिनेता आहेच. अर्थात ते गिमिक आहे. तात्पर्य.. असं असलं तरी गुंजन सक्सेना या पहिल्या महिला एअरफोर्स पायलटचं महत्व कमी होत नाही. म्हणून सिनेमा जान्हवीपेक्षा मोठा होतो. बघून घ्या एकदा.
जान्हवी सोडली.. तर बाकी सगळ्या लोकांनी पैकीच्या पैकी कामं केली आहेत. त्यातही पंकज त्रिपाठी.. वाह क्या बात है.. देखो देखो.


पिश्चर बिश्चरमध्ये या सिनेमाला मिळतायत तीन स्टार्स.