आदित्य ठाकरेंनाही जस्टिन बिबरची भुरळ, हॉटेलमध्ये 2 तास चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2017 08:06 PM (IST)
नवी मुंबई : पॉपस्टार जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तरूणाईने मोठी गर्दी केली आहे. पॉपस्टार जस्टिनचा भारतातला हा पहिलाच कार्यक्रम आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही मुंबईत जस्टिनची भेट घेतली. आदित्य ठाकरेंवरही जस्टिन बिबर यांचं फिव्हर असल्याचं यामुळे स्पष्ट झालं. खरं तर जेव्हा मायकल जॅक्सन भारतात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनीही भेट घेतली होती. आता तशीच तत्परता आदित्य ठाकरेंनी दाखवली. वाशीमधील एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि जस्टीन यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. जस्टिन बिबरच्या शोसाठी 5 हजारांपासून 15 हजारांपर्यंतच्या तिकीटांचा दर असूनही लोकांच्या रांगा याठिकाणी लागलेल्या आहेत. सुमारे 50 हजार चाहते या कॉन्सर्टसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डी वाय पाटील परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोण आहे जस्टिन बिबर? बेबी…बेबी… हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही. जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. अवघ्या 23 वर्षांच्या जस्टिन बिबरचा जन्म कॅनडात 1994 मध्ये झाला. जस्टिन बिबर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक ट्विटरवर पाहायला मिळते. ट्विटरवर जस्टिन बिबरचे 9 कोटी 34 लाख 42 हजार फॉलोअर्स आहेत.