भारतातल्या सिनेरसिकाला यशराज फिल्मस माहीत नाही असं होणं शक्य नाही. यशराज हे बॉलिवूडमधलं मोठं प्रस्थ आहे. चित्रपट निर्मितीसोबतच वितरण आणि चित्रपटाची सर्व अंगे बारीक तपासून त्या प्रत्येक क्षेत्रात यशराजने आपला ठसा उमटवला. 1970 पासून यश चोप्रा यांनी यशराजची स्थापना केली. 2020 मध्ये या कपनीला 50 वर्ष पूर्ण झाली. सध्या यशराजची कमान आदित्य चोप्राच्या हातात आहे. कंपनीची पन्नाशी जोरदार साजरी करायची असा विचार त्यांनी केला होता. केवळ भारतात नव्हे तर जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होणार होतं. पण 2020 मध्ये कोरोना आला. लॉकडाऊन लागला आणि हे प्लॅनिगं पुढच्या वर्षात गेलं. 


2021 मध्ये ही ट्रीट देण्यासाठी एकिकडे यशराज काम करू लागलं होतं. पण कोरोनाची दुसरी लाट आली. खरतर यशराजने निर्मिती केलेले सिलसिला, विजय, साथिया, धूम, वॉर, टायगर जिंदा है, मर्दानी, सुलताना, बंटी बबली असे अनेक चित्रपट भारतभरात पाहिले गेले. या सगळ्या प्रेक्षकांचे आभार या पन्नाशीमधून मानले जाणार होते. पण आदित्य चोप्रा यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोव्हिडची लाट सध्या भारतभरात उसळली आहे. या लाटेची झळ प्रत्येकाला बसली आहे. म्हणून यशराजच्या पन्नाशीसाठी काढलेलं बजेट आता कोव्हिडविरोधातल्या लढाईसाठी वापरला जाणार आहे.


यापूर्वी यशराज फौंडेशनने कोव्हिड काळात अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना योद्ध्यांना डबे देण्यापासून इंडस्ट्रीतल्या गरजवंताना आर्थिक मदत करण्यासाठी यशराज पुढे आलं आहे. आता सुवर्ण महोत्सवासाठी वापरली जाणारी ही रक्कम इकडे वळवल्याने त्याचा फायदा समाजाला होणार आहे. इंडस्ट्रीतल्या महिला व वृद्ध कलावंत, तंत्रज्ञासाठी यशराजने यापूर्वीच 5 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. आता आणखी काही गोष्टी नव्या निधीतून करता येतील. 


मदतीचा हा आकडा किती असेल ते अद्याप कळलेलं नाही. किंबहुना तो आकडा बाहेर येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जातेय. पण बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या चर्चेनुसाार आणि जी तयारी यशराजला या पन्नाशीला करायची होती ती पाहता हा निधी काही कोटींत असणार आहे असं कळतं. या निधीचा असा वापर झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा गरजवंतांना होणार आहे.