नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुरादाबादच्या कटघर परिसरात 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय टॅलेंट फुल ऑन कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर आणि अॅडगर सकारिया यांना आरोपी बनवलं आहे.


मागील वर्षी 30 सप्टेंबर रोजी दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी 37 लाख रुपयांची मोठी रक्कमही घेऊन, सोनाक्षीने अखेरच्या क्षणी येण्याचं टाळलं, असा आरोप आयोजकांचा आहे. शो रद्द केल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद शर्मा यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी विष प्राशन केलं होतं. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

दुसरीकडे पोलिसांच्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाल्यानंतर सोनाक्षीसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने दबाव टाकण्यासाठी विष प्राशन केलं.

काय होता कार्यक्रम?
दिल्लीमध्ये 30 सप्टेंबर 2018 रोजी इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुरस्कार वितरणासाठी सोनाक्षी हजर राहणार होती. यासाठी प्रमोद शर्मा यांनी टॅलेंट फुल ऑन कंपनीसोबत करार केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, सोनाक्षीच्या सचिवाशी बातचीत केल्यानंतर 32 लाख रुपये तिच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु तिने अखेरच्या क्षणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला.