मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं आज (30 जून) सकाळी निधन झालं. एबीपी न्यूजशी बोलताना मंदिराच्या निकटवर्तीयांनी राज कौशल यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं कळतं. ते 49 वर्षांचे होते. राज कौशल यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत.
राज कौशल यांना आज पहाटे 4.30 वाजता घरात हृदयविकाराचा झटका आला. घरातील सदस्य त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत देईपर्यंत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत राज कौशल यांचं निधन झालं.
चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.त्यांनी लिहिं आहे की, "आपण दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांना आज सकाळी गमावलं. अतिशय दु:खद. ते 'माय ब्रदर निखिल' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्यांपैकी ते एक होते. देश त्यांच्या आत्म्याला शांती देवो."
दरम्यान राज कौशल यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट 1966 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरात झाली होती. मंदिरा तिथे ऑडिशन देण्यासाठी गेली होती तर राज कौशल हे मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम करत होते. तिथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाला. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं.