मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करणे हे माझे भाग्य आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा सिनेमा जरुर बघावा.  आता असेही चार-पाच वर्ष सुट्टीच आहे. नेता कसा असावा हे त्यांना हा सिनेमा बघितल्यावर कळेल, असा टोला अभिनेता विवेक ओबेरॉयने लगावला आहे.

एबीपी माझा कट्टा कार्यक्रमात विवेक ओबेरॉयने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यावेळी तो म्हणाला की, राज ठाकरे कलाकारांचा खूप सन्मान करतात. राजदादा माझ्या सिनेमाविरोधात देखील बोलले. ते कलाकाराच्या विरोधात कधी बोलत नाहीत. मात्र ते या सिनेमाविरोधात बोलले. मात्र त्यांनी हा सिनेमा पाहावा, सर्व राजकारण्यांनी हा सिनेमा बघावा, असेही विवेक म्हणाला.

यावेळी त्याने शेअर केलेल्या मीमबाबत विचारले असता तो म्हणाला की, मी या मुद्द्यावर बोललो आहे. मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल बोलणार आहे. मी आता त्या मीमच्या विषयाला ब्लॉक केलय. मला सध्या माझा सिनेमा महत्वाचा आहे.

तो म्हणाला की, मी मोदी चित्रपटासाठी पैसे घेतले नाहीत. तरुणांना प्रेरणा मिळेल असा हा सिनेमा आहे. नरेंद्र मोदींचे सिनेमावर प्रेम आहे. त्यांना देखील हा सिनेमा दाखवणार आहे, असे तो म्हणाला.

यावेळी मोदी यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सिनेमात काही भाष्य आहे का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, मोदींच्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य करण्याबाबत विचार केला होता. मात्र सिनेमा पाहिल्यानंतर आपल्याकडे सिनेमातील पात्र आकर्षणाचे केंद्र बनतात. लोकांचा त्रास मोदींच्या पत्नींना होईल, हा विचार करून तो भाग टाळला असल्याचे विवेक म्हणाला.

मोदींना वेड्यासारखं फॉलो केले
या चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी पाच महिने मोदींसारखं जगत होतो. सात्विक झालो होतो. रोज प्राणायाम करायचो. या काळात वेड्यासारखं मोदींना फॉलो केलं. त्यांच्या डोळ्यातील तेज माझ्यात येण्यासाठी खूप प्रयत्न केला, असे विवेकने यावेळी सांगितले. यासाठी मी चायवाल्याच्या टपरीवर जाऊन चहा देखील वाटला, असेही त्याने सांगितले. याआधीही मी शूट आउट अॅट लोखंडवाला मधील मायाभाई करताना त्यावेळच्या गुंडांना, क्राईम करणाऱ्या लोकांना भेटलो, त्यांच्या मुलाखती घेतल्या, असेही विवेकने सांगितले.

सिनेमा प्रदर्शनाच्या आधी आमचा सिनेमा प्रोपगेंडा आहे अशी टीका झाली. मात्र आमच्या सिनेमाच्या विरोधात  प्रोपगेंडा  केला गेला. लोकं सिनेमावर बंदी यासाठी सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाकडे गेले, असे तो म्हणाला.