Vikram Gokhale Death : अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...

Vikram Gokhale Passed Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झालं आहे.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Nov 2022 06:47 PM
Vikram Gokhle Death : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

Narendra Modi : विक्रम गोखले जी एक सर्जनशील आणि बहुमुखी अभिनेते होते. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीतील अनेक मनोरंजक भूमिकांसाठी ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. 


 



Vikram Gokhle Death : विक्रम मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो : नाना पाटेकर

Nana Patekar : विक्रम मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो .....असेन...तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही. अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Eknath Shinde : अभिनयातील बहुआयामी 'विक्रम' काळाच्या पडद्याआड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vikram Gokhle Death : 'भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच 'विक्रम' करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन कला क्षेत्राची हानी आहे. अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत, रंगभूमी, दूरचित्रवाणी आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी कसदार अभिनयाने नायक, सहअभिनेता ते चरित्र नायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला. अभिनयात 'निशब्द-निश्चल'अशी जागा घेण्याचे कसब असो वा, पल्लेदार संवादफेक त्यातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. एका प्रतिभावंत मराठी सुपुत्राने भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'

Vikram Gokhle Death : विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यांतून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!

Vikram Gokhle Death : एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून व्यक्त

Sudhir Mungantiwar : मराठी रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Vikram Gokhle Death : सख्खा आणि सच्चा सहकलाकार गेला : ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर

Dilip Prabhavalkar : ज्याची भिती होती तेच झालं. त्यांच्या आजाराबद्दल मला अनेक दिवस माहित होतं. पण त्यातून ते बरे होतील असं वाटलं होतं. सख्खा आणि सच्चा सहकलाकार होता. त्यांना अभिनयाचा वारसाच मिळाला होता. ही त्यांची चौथी पिढी होती. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की आम्हाला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय यांचा एक सिमीत करणारा त्रिवेणी संगम 'बॅरिस्टर' या नाटकामध्ये बघता आला. 

Vikram Gokhle Death : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विक्रम गोखलेंना आदरांजली

Uddhav Thackeray : विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवापर्यंत ते संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असत. एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते. पण, दुर्दैव. या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो.

Vikram Gokhle Death : कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेशी, जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

Vikram Gokhle Death : ही पोकळी खूपच मोठी आहे. ती जागा भरून काढणे केवळ अशक्य : अभिनेत्री अलका कुबल

Alka Kubal : अभिनेत्री अलका कुबल यांनी विक्रम गोखलेंबद्दल प्रतिक्रिया देताना एक आठवण सांगितली. त्यांनी म्हटलं, वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा विक्रम गोखलेंबरोबर रंगभूमीवर काम केलं. नाटक होतं 'मी मालक या देहाचा'. 
विक्रम गोखलेंची ही पोकळी खूपच मोठी आहे. ती जागा भरून काढणे केवळ अशक्य आहे. कारण असा नट होणे शक्य नाही. अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

Vikram Gokhle Death : विक्रम गोखले यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी शोक व्यक्त केला

Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, त्यांच्याबरोबर फार कमी काम करण्याची संधी मिळाली पण त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत ही नेहमीच आवडलेली आहे. 

#Breaking : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड... वैकुंठ स्मशानभूमीत आज होणार अंत्यसंस्कार....

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड... वैकुंठ स्मशानभूमीत आज होणार अंत्यसंस्कार...





पार्श्वभूमी

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 


विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 


विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा दबदबा होता. त्यांनी आजवर त्यांच्या नावाप्रमाणेच अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. 'अग्निहोत्र'मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी घशाच्या त्रासामुळे नाटकापासून ब्रेक घेतला.


छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवलेले विक्रम गोखले!


विक्रम गोखलेंच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. 'या सुखानों या', 'एबी आणि सीडी', 'नटसम्राट', 'थोडं तुझं थोडं माझं', 'कळत नकळत', 'दुसरी गोष्ट', 'अनुमती', 'मी शिवाजी पार्क', 'आघात' अशा अनेक मराठी सिनेमांत विक्रम गोखलेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. तसेच 'स्वर्ग नरक', 'इंसाफ', 'अग्निपथ', 'खुदा गवाह', 'अर्धम' अशा हिंदी सिनेमांतदेखील त्यांनी काम केलं आहे. रंगभूमी, छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारे विक्रम गोखले वेब-सीरिजपासूनदेखील मागे राहिलेले नाहीत. त्यांनी 'उडान', 'क्षितिज ये संजीवनी', 'जीवन साथी', 'सिंहासन', 'मेरा नाम करेगी रोशन' या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. सध्या विक्रम गोखलेंचा 'गोदावरी' सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.