मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन झालं. मुंबईतील जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. फुफ्फुस आणि हृदयासंबंधित आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
विद्या सिन्हा यांना मागील आठवड्यात गुरुवारी (8 ऑगस्ट) क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित आजार होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यांची प्रकृती खालावली होती.
विद्या सिन्हा यांनी 80-90 च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'स्वयंवर' आणि 'पति पत्नी और वो' या सिनेमामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पति पत्नी और वो'मध्ये विद्या यांच्यासह संजीव कुमार आणि रंजिता कौर प्रमुख भूमिकेत होत्या. या चित्रपटचा रिमेक बनणार असून त्यात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणे यांची मुख्य भूमिका आहे.
चित्रपटानंतर विद्या सिन्हा यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. 'काव्यांजली', 'कुल्फी कुमार बाजेवाला' आणि 'कबूल है' या लोकप्रिय मालिकांमध्ये त्या झळकल्या.
विद्या सिन्हा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. 10 वर्षांपूर्वी त्यांनी आपले दुसरे पती डॉ. साळुंखे यांच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. 2011 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. विद्या सिन्हा 2001 मध्ये डॉक्टर साळुंखे यांच्यासोबत दुसरा विवाह केला होता.
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2019 02:22 PM (IST)
विद्या सिन्हा यांनी 80-90 च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'स्वयंवर' आणि 'पति पत्नी और वो' या सिनेमामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -