मुंबई : अभिनेता सुमीत राघवन हा नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावर आपली मतं मांडत असतो. त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर कधी त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर बोलत असतो. कलाकार भूमिका घेत नाहीत अशी ओरड एकीकडे होत असताना सुमीत मात्र त्याला नेहमीच अपवाद ठरतो आहे. आताही त्याने सोशल मीडियावर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, प्रकाशात आणला आहे. तो आहे मराठी आडनावांचा.

मराठी आडनावांचा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, अनेक जाहिरातींमध्ये मराठी आडनावांचा नेमका उच्चार समजून न घेता त्यांना हवा तसा उच्चार केला जातो. असं हिंदी जाहिरातींमध्ये होतं. त्याला आता सुमीतने वाचा फोडली आहे. त्याने केलेल्या ट्वीटमध्ये आमीर खानने केलेल्या एका जाहिरातीचा संदर्भ घेतला आहे. त्यात आमीर खान 'शिंदे' आडनावाला 'शिंडे' असं संबोधतो. ही बाब निदर्शनास आणून देताना, मराठी आडनावांची कशी गळचेपी होतेय ते सुमीतने सांगितलं आहे. 'शिंडे' हे आडनाव खरंतर शिंदे असं मराठीत वापरलं जातं. पण आमीरसारख्या माणसालाही याचा उच्चार कळू नये? केवळ आमीर नाही. त्या जाहिरातीसाठी काम करणारी जी क्रिएटिव्ह मंडळी असतात त्यापैकी कुणालाच ही बाब खटकू नये असा सवालही त्याने यात केला आहे.


मराठी आडनावांचा होणारा चोळामोळा नवा नाही. यापूर्वी हिंदी सिनेमात बऱ्याचदा अशी गंमत बघायला मिळते. यात 'चव्हाण' हे आडनाव असेल तर त्यांना बिनधास्त 'चौहान' केलं जातं. हिंदीत 'न' आणि 'ण' ची गोची तर आहेच. म्हणून 'ण' अक्षर असलेलं कोणतंही आडनाव असलं तरी त्याचा 'न' झालेला असतो. पण तो समजून घेतला जातो. सुमीतने मांडलेल्या मुद्द्यात 'ड' आणि 'द' खरंतर ही दोन्ही अक्षरं हिंदीत सर्रास वापरली जातात. तरीही याकडे केलेली डोळेझाक सुमीतमुळे आता समोर आली आहे.

विशेष म्हणजे, आपल्या पोस्टच्या शेवटी त्याने सयाजी शिंदे यांनाही यात लक्ष घालण्याचं खुसखुशीत आवाहन केलं आहे. खरंतर अनेक मराठी मंडळींनी ही जाहिरात पाहिली असेल पण इतक्या बारकाईने जाहिरात ऐकून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल सोशल मीडियावर त्याचं कौतुकही होतं आहे.