मुंबई : मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये अभिनेता सलमान खानने एका बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली. कारण होतं एका लहान मुलाला बॉडीगार्डने धक्का दिल्याचं. या सर्व घटनेचा व्हिडीओ एका चाहत्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि लगेचच तो सोशल मीडियावर वायरलही झाला.


अभिनेता सलमान खानचा भारत हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. ईदचा मुहूर्त साधत सलमानने हा सिनेमा प्रदर्शित केला. मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये सलमान भारतच्या प्रीमियर शोसाठी काल मंगळवारी रात्री आला होता. शोनंतर चाहत्यांनी सलमानला भेटण्यासाठी आग्रह धरला. सलमानच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याच्या बॉडीगार्डचा एका लहान मुलाला धक्का लागला. हे पाहून संतापलेल्या सलमानने थेट बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली.


दरम्यान नेहमीच वादात राहणाऱ्या सलमानने बॉडीगार्डला केलेली मारहाण पब्लिसिटी स्टंट असल्याचंही बोललं जात आहे. तसंच हा बॉडीगार्ड शेरा असल्याचंही सोशल मीडियावर बोललं जात होतं. पण हा बॉडीगार्ड शेरा नसून दुसरा असल्याचंही समोर आलं आहे.

सलमानचा नाशिकमधील जबरा फॅन

सलमानच्या सिनेमांची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. अशाच एका सलमानच्या फॅनने सिनेमा पाहण्यासाठी अख्खं थिएटरचं बुक केलं. नाशिकमधील आशिष सिंघल असं या चाहत्याचं नाव आहे. आशिष सलमानचे सगळे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो आणि आता तर गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आलेला भाईजानचा भारत मुव्ही फर्स्ट डे, फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर हे पूर्ण थिएटरच त्याने बुक केलं आहे.



सलमानचा सिनेमा बघण्यासाठी आशिष आपल्या सर्व मित्रांना वाजत गाजत घेऊन जातो. सलमानला भेटण्याची त्याची खूप इच्छा आहे. ज्यादिवशी सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.