मुंबई : माझ्या वडिलांनी कधीच मला सिनेमात रोल मिळवून देण्यासाठी धडपड केली नाही. मुळात, जे हयात नाहीत, त्यांच्यावर अशी टीका करणं चुकीचं आहे, अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुखने वडील आणि दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. 26/11 नंतर मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या छायेत असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मात्र मुलाला चित्रपटात भूमिका मिळण्याशी देणंघेणं होतं, अशी बोचरी टीका गोयल यांनी रविवारी केली होती.


रितेश देशमुखने ट्विटरवरुन पियुष गोयल यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

माननीय मंत्रिमहोदय,
ताज/ओबेरॉय हॉटेलमध्ये मी गेलो होतो, या तुमच्या दाव्यात तथ्य असलं, तरी गोळीबार आणि स्फोटांच्या वेळी मी तिथे उपस्थित असल्याचा तुमचा आरोप चुकीचा आहे. मी माझ्या वडिलांसोबत गेलो होतो, हे खरं आहे, मात्र ते मला सिनेमात रोल देण्यासाठी धडपडत होते, हे तथ्यहीन आहे. ते कधीच कुठल्या निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला मला सिनेमात भूमिका देण्याविषयी बोलले नाहीत. आणि मला याचा अभिमानच वाटतो. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, मात्र स्वतःवरील आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी जे हयात नाहीत, त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे. तुम्ही थोडासा उशीर केलात- सात वर्ष उशीर. नाहीतर, त्यांनी नक्कीच तुम्हाला उत्तर दिलं असतं.

- रितेश विलासराव देशमुख


काय म्हणाले होते पियुष गोयल?

'मी मुंबईहून आलो आहे. तुम्हाला मुंबईवरील 26/11 चा हल्ला लक्षात असेल. तत्कालीन काँग्रेस सरकार कमजोर होतं आणि काहीच करु शकलं नाही. ओबेरॉय हॉटेलमध्ये गोळीबार आणि स्फोट सुरु असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एका निर्मात्याला घेऊन बाहेर उभे होते. मुख्यमंत्र्यांना मुलाला चित्रपटात भूमिका मिळवून देणं महत्त्वाचं होतं' असं गोयल पंजाबमधील लुधियानात एका सभेत म्हणाले होते.

VIDEO | अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल


तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार घाबरट होतं. 2008 मध्ये मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 26/11च्या हल्ल्याला ते प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत, अशी टीकाही पियुष गोयल यांनी केली होती.