मुंबई : अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचा अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या. त्यानंतर ऋषी कपूर यांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये ऋषी कपूर आणि अभिनेते अनुपम खेर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी म्हटलं की, "प्रिय ऋषी कपूर, मॅनहॅटनच्या रस्त्यांवर तुझ्यासोबत फिरण्याचा आणि तुझ्यासोबत वेळ घालवण्याचा अनुभव खास आहे. तुझ्यासोबत गप्पा मारताना मजा येते. ऋषी कपूर यांना भेटून खूप आनंद झाला."
ऋषी कपूर यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिलं की, 'खेर फ्री' की 'केअर फ्री' उपचारादरम्यान मित्र अनुपम खेरसोबत."
ऋषी कपूर यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र कुटुंबीयांनी ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. "ऋषी कपूर यांच्या चाचण्या व्हायच्या आहेत. त्यांना काय त्रास आहे आणि कोणत्या आजाराने ते त्रस्त आहेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. इतकंच नाही तर ऋषीलाही माहित नाही की त्याला काय झालंय. वैद्यकीय चाचण्यांच्या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्यांना अॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर झाल्याचं अंदाज लोक कसा काय लावत आहेत? ऋषीच्या सगळ्या चाचण्या होऊ दे. रिपोर्ट आल्यावर आम्ही सर्वांना याची माहिती देऊ," असं रणधीर कपूर यांनी सांगितलं.
ऋषी कपूर यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. परंतु त्यांच्या अंत्यदर्शनालाही ऋषी कपूर, नितू कपूर आणि रणबीर कपूर उपस्थित नव्हते. यामुळेच ऋषी कपूर यांना ब्लड कॅन्सर असून लवकरच त्यांची किमोथेरपी सुरु होणार असल्याच्या अफवांनी जोर पडकला होता.
उपचारासाठी रवाना होण्याआधी ऋषी कपूर यांनी ट्वीट केलं होतं की, "मी कामातून छोटा ब्रेक घेऊन काही वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जात आहे. माझ्या शुभचिंतकांनी काळजी करु नये किंवा कोणतेही अंदाज लावू नये. अभिनेता म्हणून 45 वर्ष काम करताना माझ्या शरीराने बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहे. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांनी मी लवकरच परत येईन."