मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जगदीप यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. त्यांना कॅन्सर तसंच वाढत्या वयाशी संबंधित आजार होते. मुंबईतील यारी रोड इथल्या निवासस्थानी त्यांनी बुधवारी (8 जुलै) रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरातील के. सिया कब्रस्थानमध्ये सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास जगदीप यांना सुपुर्द-ए-खाक केलं जाईल. त्यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीय आणि निकवर्तीयच उपस्थित असतील.
सैयद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा जन्म 1939 मध्ये झाला होता. बाल कलाकार म्हणून त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या 'अफसाना'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. बाल कलाकार म्हणून त्यांनी अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर-पार, लैला मजनू, दो बीघा जमीन आणि एक पंछी एक डाल यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं.
यानंतर भाभी, बरखा, बिंदिया या सिनेमांमध्ये जगदीप मुख्य अभिनेता म्हणून झळकले. परंतु विनोदी कलाकार म्हणून त्यांना जास्त पसंती मिळाली. 1975 मधला सुपरहिट चित्रपट 'शोले'मधील 'सूरमा भोपाली' हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
जगदीप यांनी 'ब्रह्मचारी' चित्रपटातून विनोदी कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांचा अखेरचा चित्रपट 'गली गली चोर है' हा होता, जो 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. तसंच त्यांनी 'सूरमा भोपाली' नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं.
जगदीप यांनी तीन बहूरानियां, खिलौना, फुद्ददू, सास भी कभी बहू थी, गोरा और काला, बिदाई, आईना, एजेंट विनोद, युवराज, सुरक्षा, एक बार कहो, फिर वही रात, मोर्चा, कुर्बानी, पुराना मंदिर, शहंशाह, फूल और कांटे, अंदाज अपना अपना, चायना गेट यांसारख्या सुमारे 400 सिनेमात अभिनय करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर त्यांची मुलं जावेद जाफरी आणि नावेद जाफरी तसंच नातून मिजान जाफरीने अभिनयाच्या विश्वात पदार्पण केलं.