Actor Gaurav Bakhshi Arrested : गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याविरोधात बुधवारी रात्री तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोलवाळ पोलिसांनी अभिनेता गौरवला अटक केली. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे.
नेमकं काय झालं?
गोव्याचे पशूपालन मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतीमध्ये आयोजित रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी आपली गाडी पंचायत कार्यालयाजवळील रस्त्यावर पार्क केली होती. या गाडीसमोर गौरव बक्षी यानेदेखील गाडी पार्क केली होती.
मंत्री हळर्णकर यांच्या वाहन चालकाने गौरव बक्षी याला त्याची गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद सुरू असताना मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गौरवने थेट त्यांच्या अंगावर धावून गेला आणि शिवीगाळ करत धमकी दिली. त्याशिवाय, त्या ठिकाणी हळर्णकर यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनादेखील गौरवने धक्काबुक्की केली.
मंत्री हळर्णकर यांनी काय सांगितले?
नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले की, त्यांच्या अधिकाऱ्याने गौरवला वाहतूक कोंडी होत असल्याने त्याची कार काढण्यास सांगितले. मात्र त्याने आरडाओरड सुरू केली. मी गाडीत बसलो आणि त्याच्याशी कोणताही वाद झाला नाही. यानंतर त्याने फोनवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे होते म्हणून आम्ही निघालो. नंतर मला कळले की माझ्या पीएसओने प्रोटोकॉलनुसार त्याच्या मुख्य कार्यालयाला घटनेची माहिती दिली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला (बक्षी) बोलावल्यानंतर त्याने माझ्या विशेष कर्तव्य अधिकाऱ्याला बोलावले आणि पंतप्रधान कार्यालयाशी आपली ओळख असल्याचा दावा केला. तक्रारीची चौकशी करणे हे पोलिसांचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले.
गौरव बक्षी याने काय सांगितले?
अभिनेता गौरव बक्षी याने सांगितले की, मी माझ्या कारमधून बाहेर आलो आणि ड्रायव्हरला गाडी हलवण्याची विनंती केली, पण त्याने नकार दिला. तेव्हा मी एका माणसाला (पीएसओ) मला धमकी देताना ऐकले की, जर मी माझी गाडी हलवली नाही तर तो मला मारून टाकेल. त्यानंतर आणखी एक व्यक्ती माझ्यावर ओरडायला लागली. त्याला त्याच्या बंदुकीकडे जाताना पाहून मी काळजीत पडलो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली असल्याचे गौरवने सांगितले.
गौरव बक्षी याने 'बॉम्बे बेगम्स', 'नक्सलबाडी' यासह काही चित्रपटांमध्ये काम केले असून गोव्यात एक स्टार्ट-अप चालवत आहे.