Abhishek Bachchan: अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. अभिषेकनं  2000 मध्ये रिलीज झालेल्या 'रिफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिषेकची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होण्याआधी बच्चन कुटुंब हे कठीण काळाचा सामना करत होतं. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले की, त्यावेळी कोणीही अभिषेकला लाँच करण्याची जबाबदारी घेत नव्हतं. तसेच या मुलाखतीमध्ये अभिषेकनं त्याच्या  कुटुंबच्या कठीण काळाबद्दल देखील सांगितलं.


Galatta Plus या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेकनं सांगितलं, "20  वर्षांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तुम्ही काय परिधान कराल याबद्दल काही महिने आधीच नियोजन केले जात होते. आणि त्या दिवसात कोणीही मोफत कपडे देत नव्हते, तुम्हाला ते स्वतः विकत घ्यावे लागत होते. तुम्ही पुरस्कार सोहळा ज्या दिवशी आहे त्या संध्याकाळी शूटिंग करत नसल्याची खात्री करावी लागत होती, ज्यांना नामांकन मिळाले नाही ते लोकं पण पुरस्कार सोहळ्याला जात होते. तेथे संपूर्ण इंडस्ट्री एकत्र येत होती. एक प्रसंग असा होता की, तेव्हा मी विचार करत होतो की पुरस्कार सोहळ्याला जाताना काय परिधान करायचं? हे आता विचित्र वाटतंय, पण माझ्याकडे तेव्हा इतके चांगले कपडे नव्हते, आम्हाला नवे कपडे घेणे तेव्हा परवडत नव्हते. आम्ही एका कठीण काळातून जात होतो,  काटकसर करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो"


पुढे अभिषेकनं म्हणाला, "माझ्याकडे पुरस्कार सोहळ्यामध्ये परिधान करण्यासाठी फॉर्मल कपडे नव्हते. जीन्स आणि टी-शर्ट घालणे हे शहाणपणाचे असेल असे मला वाटत नव्हते. तर, काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलेली शेरवानी मी घातली आणि पुरस्कार सोहळ्याला गेलो."






अभिषेकनं मुलाखतीत हे देखील सांगितलं की, "जेपी दत्ता यांनी त्या पुरस्कार सोहळ्यात बॉर्डर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.जेपी दत्ता यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर स्टेजवरून खाली जात असताना अभिषेकला पाहिले. नंतर त्यांनी अभिषेकला भेटायला सांगितले. त्यानंतर त्यांनी अभिषेकला रिफ्युजी चित्रपटाची ऑफर दिली."


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Abhishek Bachchan: 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!