HC On Aaradhya Bachchan :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनच्या (Aaradhya Bachchan) याचिकेवरुन दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) युट्यूबवर ताशेरे ओढले. तसेच आराध्याबद्दल एकही खोटी बातमी युट्यूबवर (Youtube) असता कामा नये असे आदेशही दिले आहेत. भविष्यात अशा फेक न्यूज शेअर करू नयेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


आराध्याच्या तब्येतीबद्दल एका युट्यूब चॅनलनं फेक न्यूज चालवली होती. त्याविरोधात आराध्या आणि बच्चन कुटुंबीय कोर्टात गेले. या केसमध्ये गुगल आणि युट्यूबला देखील पक्षकार करण्यात आलं होतं. गुरुवारी यावर सुनावणी झाली. दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणतीही धोरणे नाहीत का, अशी विचारणा कोर्टानं केली. युट्यूब एक मंच आहे, तिथं काय शेअर केलं जातं याला आम्ही जबाबदार नाही, असा युक्तिवाद युट्यूबनं केला. कोर्टानं मात्र तो फेटाळून लावला.


आराध्याने अॅंड. आनंद नाईक यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे."बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा बेकायदेशीरपणे वापर करत चांगले पैसे कमावणं हा या फेक न्यूज चालवणाऱ्या युट्यूब चॅनल्सचा हेतू आहे", असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुगल एलएलसी आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान यांनाही पक्षकार बनवण्यात आलं आहे. 






आराध्याला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना 


11 वर्षीय आराध्या बच्चनला लहानपणापासूनच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. बॉलिवूडच्या स्टार किडपैकी आराध्या खूपच लोकप्रिय आहे. तिच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आपल्या लाडक्या लेकीची खूपच काळजी घेत असतात. यआधी आराध्याच्या ट्रोलिंग बाबत आणि नकारात्मक गोष्टी पसवणाऱ्यांना अभिषेक बच्चनने सडेतोड उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता,"आराध्या विरोधातील कोणतीच अश्लील गोष्ट खपवून घेणार नाही". सोशल मीडियावर अनेकदा आराध्याचे फोटो व्हायरल होत असतात.


आराध्या आता सहावीत असून धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत ती शिक्षण घेत आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चनसोबतचे आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. 



संबंधित बातम्या


Aaradhya Bachchan : फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात धाव, आज होणार सुनावणी