'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार?
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 12:06 PM (IST)
मुंबई : 'फँड्री' आणि 'सैराट'वर फिदा झालेला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान आता थेट दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. नव्या प्रोजेक्टसाठी दोघे एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी आमीर खानने नागराज मंजुळेच्या 'फँड्री'चं कौतुक केलं होतं. तर काही महिन्यापूर्वीच आलेला 'सैराट' पाहून आमीर भारावला होता. शिवाय चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचंही आवाहन केलं होतं. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'सैराट'ने मराठीलाच नाही तर बॉलिवूडलाही भूरळ घातली. नागराजच्या दिग्दर्शन कौशल्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीरला आता नागराजसोबत काम करण्याचे वेध लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, 'सैराट'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने या सिनेमाला संगीत दिलं. 'सैराट'च्या गाण्यांनी सगळ्यांना अक्षरश: याड लावलं आहे. अजय-अतुलने याआधी 2014 मध्ये आलेल्या 'पीके' सिनेमासाठी आमीरसोबत काम केलं आहे.