Aamir Khan : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला आमीर खान नेहमीच चर्चेत असतो. तो दोन किंवा तीन वर्षांत एकच चित्रपट काढतो, मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो. आगामी काळात आमीर खानचे अनेक मोठे चित्रपट येणार आहेत. या चित्रपटांत आमीर खान वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, आमीर खान त्याच्या चित्रपटांसाठी फी घेत नसल्याचं समोर आलं आहे. 

चित्रपट फ्लॉप ठरला की मात्र...

एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात आमीर खानने नुकतेच हजेरी लावली होती. यावेळी त्याने वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडलं. सोबतच त्याने त्याच्या आगामी चित्रपटांवरही त्यानं भाष्य केलं. चित्रपटाच्या कमाईचं गणित सांगताना त्याने मी चित्रपटात काम करण्याची फी घेत नाही, असं त्यांनं सांगितलं. "चित्रपट प्रसिद्ध झाला की त्यातून माझी कमाई होते. चित्रपट फ्लॉप ठरला की मात्र माझी कोणताही कमाई होत नाही," असे आमीर खानने सांगितले. जेव्हा माझा चित्रपट फ्लॉप होतो, तेव्हा मला फी देण्याचं दडपण माझ्या निर्मात्यांवर नसतं. पण चित्रपट हिट ठरला की मला माझा हिस्सा मिळतो, असं आमीर खानने सांगितलं. गेल्या 20 वर्षांपासून आमीर खान चित्रपटात काम करण्याची फी घेत नाही.

आमीर खानने दिलं युरोपाचं उदाहरण

कोणत्याही प्रोडक्शन हाऊसला त्यांचा खर्च भरून काढण्यासाठी कमीत कमी 20 ते 30 कोटी रुपयांची कमाई करावी लागते. एखाद्या चित्रपटाचे बजेट 200 कोटी रुपये असेल आणि त्यातील कलाकार भरपूर फी घेत असतील तर मग चित्रपटाचा खर्च कसा निघेल? मात्र मी वापरत असलेली पद्धत सर्वांत जुणी आहे. युरोपात गेलं की आजही लोक आपली कला सादर करतात आणि तुम्हाला कला आवडली तरच पैसे द्या, असे म्हटले जाते. माझंही तसंच आहे. चित्रपट हिट ठरला तरच मला पैसे मिळतात, असेही आमीर खानने सांगितले. 

दोन चित्रपट ठरले फ्लॉप

दरम्यान, गेल्या 37 वर्षांपासून आमीर खान सिनेसृष्टीत वेगवेगळे रेकॉर्ड्स मोडत आलेला आहे. त्याने आतापर्यंत 3 इडियट्स, पीके, दंगल, रंगीला, फना, तारे जमीन पर यासारखे चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांना लोकांनी विशेष प्रेम दिलेलं आहे. आमीर खानचे नुकतेच ठग्स ऑफ हिंदुस्तान आणि लाल सिंह चड्ढा हे चित्रपट आले होते. हे दोन्ही चित्रपट मात्र फ्लॉप ठरले. आता लवकरच आमीर खानचा सितारे जमीन पर हा नवा चित्रपट येत आहे.     

हेही वाचा :

असे हिरो-हिरोईन ज्यांची लव्हस्टोरी जणू दुसरा चित्रपटच! अभिनय करताना जीव जडला अन्... शोएब-दीपिका यांची कहाणी नेमकी काय?

रुपडं असं की सर्वांनाच पडली भुरळ, हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरेंची लेक जणू सौंदर्याची खाणच; पाहा खास फोटो!

एजे करणार लीलाला फिल्मी स्टाईलने प्रपोज, थेट कश्मीरच्या बर्फात दोघांत फुलणार रोमान्स, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचे खास फोटो समोर!