Aadesh Bandekar : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. बांदेकर वाई ते मुंबई प्रवासादरम्यान एक तास बोगद्यामध्ये अडकले होते. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी प्रवासादरम्यानचा अनुभव सांगितला आहे.
आदेश बांदेकरांनी शेअर केला व्हिडीओ (Aadesh Bandekar Video)
आदेश बांदेकरांनी महामार्गावर प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामध्ये एक तास अडकून राहणं ही वेळ कोणावरच येऊ नये. पुन्हा प्रवास सुरू. धन्यवाद खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांना".
आदेश बांदेकर व्हिडीओमध्ये म्हणत आहेत,"हा भलामोठा कंटेनर खंबाटकी घाटातील बोगद्यात अडकला आहे. या एका कंटनेरमुळे संपूर्ण बोगद्यात ट्रॅफिक झालं असून सगळ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्या चालकाने कोणताही विचार न करता बोगद्यापेक्षा मोठ्या आकाराचा कंटेनर चालवून या मार्गाने प्रवास केला. त्याच्या चुकीमुळे सगळ्या प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागलं. असंख्य प्रवासी बोगद्यात अडकून पडले. पण, खऱ्या अर्थाने पोलिसांचे आभार मानले पाहिजेत. कारण, पोलीस व काही प्रवासी या सगळ्यांनी मिळून तो कंटनेर बाहेर काढला".
आदेश बांदेकर पुढे म्हणाले,"एकीकडे बोगद्यात कंटनेरमुळे अडचणी निर्माण झाल्या असताना दुसरीकडे बोगद्याच्या प्रवेशद्वारसमोर आणखी एक कंटनेर उलटला होता. क्रेनच्या साहाय्याने त्या कंटनेरला बाजूला हटवण्यात आलं. हे असेच अपघात होत राहिले, तर पाठीमागून येणारी एखादी रुग्णवाहिका अडकून यामुळे नाहक बळी जाऊ शकतो. देव या चालकांना सुबुद्धी देवो".
बांदेकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
आदेश बांदेकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बोगद्याच्या आधी जर किती उंचीचे वाहन नेता येईल याचा बोर्ड लावला तर काम सोपे होईल, आजकाल असे प्रकार वाढले आहेत, काळजी घ्या, स्वामींची कृपा सुटका झाली, श्री स्वामी समर्थ, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आदेश बांदेकरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
संंबंधित बातम्या