DDLJ : बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांची नावं घेताना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाचं नाव अग्रक्रमी येतं. आज म्हणजेच 20 ऑक्टोबरला या चित्रपटाला तब्बल 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने आणि तितक्याच उत्सुकतेने पाहतात. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने साकारलेला ‘राज मल्होत्रा’ आणि काजोलने (Kajol) साकारलेली ‘सिमरन’ ही पात्र आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात.


या चित्रपटातून शाहरुख खानने साकारलेला ‘राज मल्होत्रा’ घरोघरी प्रसिद्ध झाला. शाहरुख खानने या पात्राला अक्षरशः जिवंत केले होते. आज 27 वर्षांनंतरही राज मल्होत्रा हे नाव ऐकलं की, डोळ्यांसमोर केवळ शाहरुख खानचाच चेहरा येतो. मात्र, या भूमिकेसाठी शाहरुख खानची निवड होणार नव्हती. अर्थात या भूमिकेसाठी निर्मात्यांनी एका दुसऱ्याच अभिनेत्याची निवड केली होती.  


शाहरुख नव्हे सैफला ऑफर झाली होती भूमिका!


शाहरुख खान नाही, तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील मुख्य भूमिका ऑफर करण्यात आली होती. इतकेच नाही, तर या चित्रपटासाठी त्याला दिग्दर्शकाने साईन देखील केले होते. पण, आत्यावेळी तारखांचं गणित न जुळून आल्याने सैफने भूमिका नाकारली आणि त्यानंतर ही भूमिका शाहरुख खानच्या वाट्याला आली.


किरण खेर यांनी दिलं चित्रपटाला नाव!


या चित्रपटाच्या नावावर सल्लामसलत सुरु असताना अभिनेत्री किरण खेर यांनी जेव्हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे नाव सुचवले, तेव्हा सर्वांना वाटले की ही नाव खूप मोठे आहे. शाहरुखही या शीर्षकावर विशेष खूश नव्हता. पण आदित्य चोप्राला हे शीर्षक आवडले. त्याला हे शीर्षक अधिक आकर्षक आणि मनोरंजक वाटले. चित्रपटाच्या ओपनिंग टायटलचे श्रेयही त्याने किरण यांना दिले आहे.


हॉलिवूड चित्रपटातून घेतली प्रेरणा


DDLJ ने एक नव्हे तर दोन आंतरराष्ट्रीय चित्रपटांपासून प्रेरणा घेतली आहे. चित्रपटातील 'पलट' सीन 'द लाइन ऑफ फायर' या हॉलिवूड चित्रपटातील एका सीनवरून प्रेरित होता. तर, सिमरनच्या मावशीच्या साडी घेण्यात मदत करण्याचा सीन ‘विटनेस फॉर द प्रोसिक्युशन’मधून घेण्यात आला होता.


अवघ्या महिनाभरात पूर्ण झाली चित्रपटाची स्क्रिप्ट!


या चित्रपटाबद्दल सांगताना करण जोहर म्हणाला होता की, आदित्य चोप्राच्या डोक्यात या चित्रपटाची कथा पहिल्यापासूनच तयार होती. तो या चित्रपटाच्या कथेबाबत अगदी क्लीअर होता. चित्रपटाच्या शेड्युलचा प्राथमिक आराखडा तयार झाल्यानंतर त्याने ही सगळी कथा कागदावर उतरवली. अवघ्या 3-4 ते आठवड्यात या चित्रपटाची कथा लिहून तयार झाली होती.


हेही वाचा :


26 वर्षानंतर DDLJ ब्रॉडवेवर नव्या रूपात ; आदित्य चोप्राने शेअर केली पोस्ट