Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) माजी संचालकांना सहा आठवड्याच्या आत 10 लाख 78 हजार 593 रुपये भरण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिले आहेत. पुण्यात पार पडलेल्या 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमासाठी तात्कालीन संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. यावर सभासदांनी आक्षेप घेतला होता. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कारवाई झाली असल्याचं अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे.
कोल्हापूरातील काही सभासदांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. यावर प्रथम चॅरिटी कमिशनर कोल्हापूर यांनी ही रक्कम भरण्याचा आदेश दिला होता. परंतु टंकलिखाणाची चूक झाल्याने तात्कालीन संचालकांनी रक्कम भरलीच नाही. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर चॅरिटी कमिशनर यांनी टंकलिखाणाची चूक सुधारून नव्याने आदेश काढून उपरोक्त रक्कम भरण्याचा आदेश दिला. परंतु यावेळी याच संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर त्यांना प्रथम ही रक्कम न्यायालयात जमा करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला असल्याचं, मेघराज राजेभोसले म्हणाले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच सर्व संचालकांवर अशी कारवाई झाली आहे. प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, इम्तियाज बारगिर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती आणि रवींद्र बोरगावकर यांना हा आदेश लागू आहे. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णायानंतर दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याचं मेघराज राजेभोसले म्हणाले आहेत.
कोर्टाच्या आदेशाची प्रत दाखवा - विजय पाटकर
"कोर्टाच्या आदेशाची प्रत कुठे आहे ती दाखवा, अशी मागणी विजय पाटकरांनी एबीपी माझाशी संवाद साधताना केली आहे.
संबंधित बातम्या