Sigham Again vs Bhulbhulaiyya 3: गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे बॉलीवूडच्या दोन सिनेमांची चांगली चर्चा आहे. सिंघम अगेन आणि भूलभुलैय्या 3 या चित्रपटांच्या स्क्रीन आणि तिकिटांच्या विक्रीवरून झालेले वादही सर्वश्रुत आहेत. एक नोव्हेंबरला हे दोनही चित्रपट आमने सामने येणार असून कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतात यावरून चर्चांच्या अनेक फैरी झडल्या. दिवाळीचा मुहूर्तावर या दोन्ही चित्रपटांचे बंद झालेले आगाऊ बुकिंग आता सुरू झाले आहे. पण सध्या या चित्रपटांच्या तिकिटांची किंमत मुंबई आणि दिल्ली या मेट्रो शहरांमध्ये 2500 हजार रुपयांच्याही वर गेल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईच्या Maison PVR जिओ वर्ल्ड ड्राईव्ह या सिनेमागृहाचं सिंघम अगेन या चित्रपटाचे तिकीट 3000 रुपयांपर्यंत गेलं आहे. तर भुलभुलय्या चित्रपटाचे तिकीटही 2250 रुपये असल्याचं दिसत आहे. 






कोणत्या शहरात किती टिकीट? 


सिंघम अगेन आणि भुलभुलय्या थ्री हे दोन चित्रपट एक नोव्हेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. दरम्यान मुंबई आणि दिल्लीच्या चित्रपटगृहांमध्ये या दोन्ही सिनेमांच्या तिकिटांच्या किमती अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत गेल्याचं दिसतंय. मेट्रो शहरांमध्ये काही थेटरमध्ये अशी स्थिती असून इतर शहरांमध्ये साधारणतः तिकिटाच्या किमती या 350 ते 450 रुपयांपर्यंत गेल्याचं दिसत आहे. पुण्यातील पेवेलियन मॉलमध्ये भुलभूलैय्या 3 चं तिकीट साधारण 500 रुपयांपासून 1700 रुपयांपर्यंत गेल्याचं दिसतंय. तर सिंघम अगेनची तिकीटं साधारण 500 ते 700 रुपयांपर्यंत गेली आहेत.


पहिल्या दिवशी कोणता चित्रपट किती कमाई करेल? 


इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, सिंघम अगेन या चित्रपटाची पहिला दिवसाची बॉक्स ऑफिस वरील कमाई ही 35 कोटींच्या घरात असू शकते. तर भुलभुलय्या 3 भारतात त्याच दिवशी 25 कोटी कमावण्याची शक्यता आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित यांची स्टारकास्ट असणारा भुलभुलय्या 3 आणि अजय देवगन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह स्टारकास्ट असणारा सिंघम अगेन या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले. स्क्रीन आणि तिकिटाच्या वादांमुळे या दोन्ही सिनेमांचं आगाऊ बुकिंग बंद करण्यात आलं होतं. ते आता पुन्हा सुरू करण्यात आलाय.