मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता आणि ज्येष्ठ नेते रवी राजा (Ravi Raja Resigns) यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर रवी राजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारंसघातून काँग्रेसने (Congress) गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने रवी राजा प्रचंड नाराज होते. याच नाराजीतून रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जाते.
रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांची मुंबईतील अनेक आंदोलने चर्चेचा विषय ठरली आहेत. एकूण रवी राजा हा मुंबईतील काँग्रेसचा सक्रिय आणि जमिनीवर उतरून काम करणारा कार्यकर्ता होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राजा यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रवी राजा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून तीन उमेदवार इच्छुक होते. त्यात पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांचे सुपुत्र काँग्रेसचे मुंबई सचिव अमित शेट्टी आणि काँग्रेसचे सचिव गणेश यादव यांचा समावेश होता. मात्र, रवी राजा आणि अमित शेट्टी यांना डावलून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रवी राजा आणि अमित शेट्टी यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून दाद न मिळाल्यामुळे रवी राजा यांनी बुधवारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला. तर अमित शेट्टी यांनीही वर्षा गायकवाड यांच्या मुंबई काँग्रेसमधील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तेदेखील वेगळा निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल.
मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक
साडेअकरा वाजता भाजपची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची आहे. भाजपकडून नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून नाराजी आहे, यावर चर्चा होईल. सोबतच सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरी याबाबत देखील चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.
आणखी वाचा
बंडखोरांचं मन वळवण्यासाठी सत्तेत येण्यापूर्वीच मविआचे 'करारमदार'; महामंडळ आणि विधानपरिषदेचं आश्वासन